गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना आज भारतीय सैन्यदलाने काल रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणांवर विध्वंसक एअर स्ट्राईक केली होती. या हल्ल्यांदरम्यान, भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरिदके आणि बहावलपूर येथील लष्करी तळांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात लष्कर ए तोयबाचे अनेक दहशतवादी मारले गेले. दरम्यान, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हाफिझ अब्दुल रौफ हा दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे काही अधिकारी आणि पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर हाफिझ अब्दुल रौफ हा ऑपरेशन सिंदूरदरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला. त्याने अंत्ययात्रेमध्ये नमाज पढली. यादरम्यान, लष्कर आणि पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. तसेच या अंत्ययात्रेत पंजाबचे आयजीसुद्धा सहभागी झाले होते.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट व्यक्त होत होती. तसेच या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणीही करण्यात येत होती. अखेर काल रात्री भारताच्या सैन्यदलांनी मोठी करावाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले.