चॅट जीपीटीला सांगितलं पैशांचा जुगाड कर, एका मिनिटांत खात्यात जमा झाली एवढी रक्कम, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:19 IST2023-04-03T20:17:59+5:302023-04-03T20:19:16+5:30
Chat GPT : चॅट जीपीटीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता चॅट जीपीटी लोकांचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करू लागले आहे.

चॅट जीपीटीला सांगितलं पैशांचा जुगाड कर, एका मिनिटांत खात्यात जमा झाली एवढी रक्कम, त्यानंतर...
चॅट जीपीटीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता चॅट जीपीटी लोकांचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करू लागले आहे. DoNotPay चे सीईओ, जोशुआ ब्राउडर यांनी सांगितले की, त्यांनी चॅट जीपीटीला आपले हरवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यामध्ये २१० डॉलर म्हणजेच सुमारे १७ हजार २०० रुपये जमा झाले. त्यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती देताना सांगितले की, मी नव्या चॅट जीपीटी बाउझिंग एक्स्टेंशनच्या माध्यमातून माझ्यासाठी काही पैसे शोधण्यास सांगितले. त्यानंतर एका मिनिटाच्या आत कॅलिफोर्निया सरकारकडून माझ्या खात्यामध्ये २१० डॉलर जमा झाले. मात्र हा दावा खराच आहे का, याला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.
ब्राउडर यांनी सांगितले की, सर्वप्रथम चॅट जीपीटीने त्यांना कॅलिफोर्निया स्टेट कंट्रोलर वेबसाईटवर जाण्याचा सल्ला दिला. या वेबसाईटवर अनक्लेम फंड्सची माहिती पुरवली जाते. उदाहरणार्थ जर कुठली कंपनी तु्म्हाला रिफंड करू इच्छित असेल मात्र तुमच्याशी संपर्क होत नसेल तर या वेबसाईटकडे हा फंड उपलब्ध असतो. चॅट जीपीटीने ब्राऊडर यांना ते कशाप्रकारे या पैशांवर दावा करू शकतात. याबाबत माहिती दिली.
ब्राऊडर यांनी सांगितले की, चॅट जीपीटीने जे सांगितले, तसे त्यांनी केले. त्यानंतर एका मिनिटाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये २०९.६७ रुपये ट्रान्सफर झाले. DoNotPay च्या सीईओंनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टप्प्याला स्वत:ही पूर्ण करू शकतात. मात्र, असं इंटिग्रेशन केल्याने कंपन्यांचं नुकसान होईल. त्यांनी सांगितले की, चॅटजीपीटीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यापासून केवळ एक कॅप्चाच थांबवू शकतो.