पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 05:45 IST2025-10-19T05:45:18+5:302025-10-19T05:45:52+5:30
तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या टी२० मालिका स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
इस्लामाबाद :पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंसह १४ जण ठार व १६ जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. हा हल्ला पाकिस्तान- अफगाणिस्तान यांच्यातील ४८ तासांच्या युद्धविरामानंतर काही तासांतच झाला. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता युद्धविराम झाला होता. पण त्यानंतर पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील उरगुन व बर्मल जिल्ह्यांवर हवाई हल्ले केले.
या हल्ल्यात पाकिस्तान-अफगाण सीमा विभागणाऱ्या ड्युरंड लाइनजवळील अनेक घरे उद्ध्वस्त झाली. त्यात पक्तिका प्रांताच्या राजधानी शरानामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळून परतणारे कबीर, सिबघातुल्लाह, हारून हे क्रिकेटपटू ठार झाले. हल्ल्याच्या दिवशी कबीरने आपल्या गावातील स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब जिंकला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अफगाणिस्तानची टी-२० स्पर्धेतून माघार
तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या टी२० मालिका स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान संघाचे सामने १७ आणि २३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार होते. या मालिकेत पाकिस्तान, अफगाणिस्तानबरोबर श्रीलंकाही खेळणार आहे.
पाककडून ४ वर्षांत १,२०० सीमा उल्लंघन
गेल्या चार वर्षांत पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेचे १,२०० पेक्षा जास्त वेळा उल्लंघन केले असून, ७१० वेळा हवाई हद्दीचा भंग केला आहे, असे अफगाणिस्तानच्या सूत्रांनी शनिवारी सांगितले. ११ ऑक्टोबरपासून हा संघर्ष सुरू आहे.