"हे ड्रग्जसाठी नाही तर तेलासाठी युद्ध!" व्हेनेझुएला कारवाईवरून कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:11 IST2026-01-04T11:11:10+5:302026-01-04T11:11:50+5:30
Kamala Harris Criticizes Donald Trump: व्हेनेझुएलातील कारवाईवर माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस संतापल्या. डोनाल्ड ट्रम्प केवळ तेलासाठी सैनिकांचे प्राण धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर.

"हे ड्रग्जसाठी नाही तर तेलासाठी युद्ध!" व्हेनेझुएला कारवाईवरून कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये केलेल्या लष्करी कारवाईवरून देशांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, "हे प्रकरण लोकशाही किंवा अमली पदार्थांच्या तस्करीचे नसून केवळ तेलासाठी पुकारलेले युद्ध आहे," असा गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर केला आहे.
हॅरिस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, "ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा मजबूत झालेली नाही. निकोलस मादुरो हे हुकूमशहा असले तरी, त्यांच्याविरुद्ध केलेली ही कारवाई बेकायदेशीर आणि अविचारी आहे. सत्तेसाठी किंवा तेलासाठी केलेली ही युद्धे शेवटी अराजकतेकडे नेतात आणि त्याची किंमत अमेरिकन कुटुंबांना मोजावी लागते."
कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांना 'खोटेपणा' म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, जर ट्रम्प यांना खरोखरच लोकशाहीची काळजी असती, तर त्यांनी व्हेनेझुएलातील वैध विरोधी पक्षाला डावलून मादुरोच्या साथीदारांशी करार केले नसते. "ट्रम्प यांना केवळ प्रादेशिक शक्ती बनायचे आहे. त्यांनी अमली पदार्थांच्या तस्करांना माफी दिली आहे, मग आता ते ड्रग्जच्या विरोधात कारवाईचा आव का आणत आहेत?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सैनिकांचे प्राण धोक्यात घातल्याचा दावा
लष्करी कारवाईमुळे अमेरिकन सैनिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोपही हॅरिस यांनी केला आहे. "राष्ट्राध्यक्ष कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय आणि ठोस 'एक्झिट प्लॅन'शिवाय अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. यामुळे संपूर्ण क्षेत्र अस्थिर होईल आणि देशाला कोणताही फायदा होणार नाही," असे त्या म्हणाल्या. अमेरिकेला अशा नेतृत्वाची गरज आहे जे युद्धाऐवजी महागाई कमी करण्याला आणि कायद्याच्या राज्याला प्राधान्य देईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.