"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:49 IST2025-06-15T12:47:05+5:302025-06-15T12:49:52+5:30
तुर्की टेक्निकने बोईंग ७८७-८ प्रवासी विमानाची देखभाल केल्याचा दावा खोटा आहे, असं तुर्कीच्या कम्युनिकेशन डायरेक्टरेटने म्हटले आहे.

"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. एका प्रवाशाचा जीव वाचला. याशिवाय, विमान कोसळलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमधील काही डॉक्टरांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर तुर्कीवर आरोप सुरू आहेत. यावर आता तुर्कीकडून निवेदन प्रसिद्ध केले आहे. तुर्कीने म्हटले आहे की, "त्यांच्या देशाची कंपनी एअर इंडिया बोईंग 787-8 च्या मेंटनन्समध्ये सहभागी नाही. तुर्की टेक्निकने बोईंग 787-8 प्रवासी विमानाची देखभाल केल्याचा दावा खोटा आहे".
तुर्कीकडून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हे निवेदन शेअर केले आहे. या निवेदनानुसार, तुर्कीची एक कंपनी विमानाची देखभाल करत असल्याचे म्हणणे दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल गोंधळ पसरवण्यासारखे आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये एअर इंडिया आणि तुर्की टेक्निक यांच्यात झालेल्या करारांतर्गत, केवळ B777 विमानांसाठी देखभाल सेवा प्रदान केल्या जातात. अपघातात सहभागी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या कराराच्या कक्षेत येत नाही. आजपर्यंत, तुर्की टेक्निकने या प्रकारच्या कोणत्याही एअर इंडिया विमानाची देखभाल केलेली नाही.
तुर्कीने अपघातावर दुःख व्यक्त केले
तुर्कीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, क्रॅश झालेल्या विमानाची देखभाल कोणत्या कंपनीने केली हे त्यांना माहिती आहे. परंतु याबद्दल काहीही बोलणे हे आवाक्याबाहेरचे ठरेल. यामुळे अधिक गोंधळ पसरेल. निवेदनानुसार, अशा खोट्या गोष्टींना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे एक यंत्रणा आहे. या खोट्या गोष्टींविरुद्ध कारवाई केली जाईल. भारतात झालेल्या या अपघातात तुर्कीचे लोक भारताच्या दुःखात सहभागी आहेत.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली होती. याशिवाय, पाकिस्तानने भारतावर तुर्की-निर्मित ड्रोनचा वापर केला होता. यावेळी, भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर सेवा व्यवस्थापित करणाऱ्या तुर्की कंपनीला माघार घ्यावी लागली.