"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:41 IST2026-01-27T15:39:29+5:302026-01-27T15:41:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली...

"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला
भारत आणि युरोपियन युनियन (EU) मधील ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची (FTA) संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हणून संबोधले आहे. एवढेच नाही तर, 'ही तर केवळ सुरुवात' असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या कराराने भारत आणि युरोपीय युनियन या दोन्हींसाठीही संधींची दारे उघडल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत उर्सुला वॉन डेर लेयेन म्हणाल्या, "आज युरोप आणि भारत इतिहास घडवत आहेत. आम्ही ‘मदर ऑफ ऑल डील्स’ पूर्ण केली असून, दोन अब्ज लोकांसाठी मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दोन्ही बाजूंना फायदा होईल. ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही आमची दोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करू."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली. 'भारतीय ऊर्जा सप्ताहा'ला ऑनलाइन संबोधित करताना ते म्हणाले, "भारत आणि युरोपमध्ये एक मोठा करार झाला असून जगभरात याला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हटले जात आहे." हा करार जागतिक जीडीपीच्या २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश हिस्सा कव्हर करतो.
१४० कोटी भारतीयांसाठी नवी आणि मोठी संधी -
यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "या करारामुळे केवळ युरोपच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही नव्या संधी निर्माण होतील. हा करार ब्रिटन आणि 'EFTA' सोबत झालेल्या करारांना पूरक ठरेल. यामुळे भारताच्या निर्मिती (Manufacturing) आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल. त्यांनी प्रामुख्याने कापडा, रत्ने, दागिने, चामडे आणि पादत्राणे आदी क्षेत्रांतील तरुणांना आणि व्यावसायिकांना शुभेच्छाही दिल्या." यावेळी, या ऐतिहासिक करारामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.