"हा तर फक्त ट्रेलर, खरी लाट अजून यायची आहे"; अयातुल्लांच्या खात्म्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 23:42 IST2026-03-02T23:25:38+5:302026-03-02T23:42:00+5:30
इराणला गुडघ्यावर आणलं असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

"हा तर फक्त ट्रेलर, खरी लाट अजून यायची आहे"; अयातुल्लांच्या खात्म्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump on Iran: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत खळबळजनक माहिती दिली. "इराणवर आमचे भीषण आणि विनाशकारी हल्ले सुरू असून आम्ही त्यांना गुडघ्यावर आणले आहे, पण हा तर फक्त ट्रेलर आहे. यापेक्षा भीषण हल्ल्यांची मोठी लाट अजून येणे बाकी आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला संपूर्ण विनाशाचा इशारा दिला आहे.
इराणमध्ये हाहाकार, ५५० हून अधिक मृत्यू
अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह अनेक बड्या लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या दाव्यानुसार, आतापर्यंत ५५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण इराणमध्ये विध्वंसाची स्थिती आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणची नौदलाची १० जहाजे आता समुद्राच्या तळाशी आहेत आणि त्यांची क्षेपणास्त्र यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली जात आहे.
आमच्या ब्युटीफुल अमेरिकावर इराणची नजर होती
हल्ल्याचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, "इराणचा बॅलिस्टिक मिसाईल्सचा कार्यक्रम अत्यंत वेगाने वाढत होता. त्यांच्याकडे युरोप आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर मारा करण्याची क्षमता होतीच, पण लवकरच ते आमच्या सुंदर अमेरिकेपर्यंत पोहोचणारी क्षेपणास्त्रे तयार करणार होते. ओबामा यांनी केलेल्या कमकुवत करारामुळे इराणकडे तीन वर्षांपूर्वीच अण्वस्त्रे आली असती, पण मी तो करार मोडीत काढला. आता इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ देणे हे अमेरिकेसाठी असह्य संकट होते."
"ही शेवटची आणि सर्वोत्तम संधी"
"इराणमधील या पापी राजवटीला संपवण्याची हीच आमची शेवटची आणि सर्वोत्तम संधी आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले. ४ अमेरिकन सैनिकांच्या बलिदानाचा उल्लेख करताना ते भावूक झाले आणि म्हणाले की, त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी आम्ही ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवू. गरजेनुसार आम्ही इराणच्या भूमीवर सैन्य उतरवायलाही मागे-पुढे पाहणार नाही.
इराणच्या जनतेला आवाहन
इराणी जनतेला तिथल्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अमेरिका मदत करत आहे का? या प्रश्नावर ट्रम्प यांनी 'हो' असे उत्तर दिले. मात्र, सध्या परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याने इराणी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.