इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:02 IST2025-08-27T18:02:01+5:302025-08-27T18:02:43+5:30

जगातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत आहे. युक्रेन-रशिया आणि इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षाने अणुयुद्धाची शक्यता वाढवली आहे.

This country is preparing for war like Israel, work has begun in 81 regions! | इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!

इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!

जगातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत आहे. युक्रेन-रशिया आणि इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षाने अणुयुद्धाची शक्यता वाढवली आहे. त्यामुळे अनेक देशांनी बंकर्स आणि बॉम्ब शेल्टर्सची गरज ओळखली असून, त्यांच्या बांधकामाला वेग दिला आहे. तुर्कीच्या 'एनटीव्ही' (NTV) या वाहिनीच्या वृत्तानुसार, तुर्की सरकारने संभाव्य युद्धाच्या तयारीसाठी देशातील ८१ प्रांतांमध्ये शेल्टर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

तुर्कीच्या धोरणातून मोठे संकेत
तुर्कीने गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सीरिया ते पाकिस्तानपर्यंत अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये तुर्कीचा हस्तक्षेप वाढत आहे. अशा परिस्थितीत, देशभरात शेल्टर्स बांधण्याचा निर्णय तुर्की एका मोठ्या युद्धाची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

'एनटीव्ही'ने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या 'पर्यावरण, शहरी नियोजन आणि हवामान बदल मंत्रालयाने' एक अभ्यास केला. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, तुर्कीमध्ये अशा निवाऱ्यांच्या पायाभूत सुविधांची कमतरता आहे आणि सध्या उपलब्ध असलेले निवारे गरजा पूर्ण करू शकत नाहीत.

सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष
सरकारने केलेल्या या सर्वेक्षणात इस्त्रायल, जपान आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांतील निवारा बांधकामाच्या आंतरराष्ट्रीय अनुभवांचा संदर्भ देण्यात आला आहे. या आधारावर, तुर्कीसाठी शहरांच्या आणि निवासी भागांच्या गरजेनुसार एक विशेष 'तुर्की मॉडेल' लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

एर्दोआन यांचा आदेश
राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, या प्रकल्पाची जबाबदारी सरकारी गृहनिर्माण आणि शहरी विकास कंपनी 'टोकी'ला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला राजधानी अंकारासह अनेक महत्त्वाच्या प्रांतांमध्ये या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे 'एनटीव्ही'ने सांगितले. तुर्की सरकारचे हे पाऊल भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून देशातील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी उचलण्यात आले आहे.

Web Title: This country is preparing for war like Israel, work has begun in 81 regions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.