किंमत चुकवावीच लागेल; ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्षांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:05 IST2026-01-06T10:05:10+5:302026-01-06T10:05:10+5:30
देशासाठी योग्य निर्णय न घेतल्यास उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्वेज यांच्यावरही होणार कारवाई

किंमत चुकवावीच लागेल; ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्षांना इशारा
वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्वेज यांनी देशासाठी योग्य निर्णय न घेतल्यास त्यांना राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोपेक्षा मोठी किंमत मोजावी लागू शकते असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
अमेरिकेच्या लष्कराने व्हेनेझुएलामध्ये कारवाई करून मादुरो व त्यांच्या पत्नीला अटक करून देशाबाहेर नेले. त्यावेळी ट्रम्प यांनी रोड्रिग्वेज यांचे कौतुक केले होते. मी व्हेनेझुएलातील नैसर्गिक संसाधने सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलेन, असे रोड्रिग्वेज यांनी त्याआधी सांगितले होते.
ट्रम्प यांनी द अटलांटिक मासिकाला सांगितले की, व्हेनेझुएलाचे प्रमुख निकोलस मादुरो यांना लष्करी कारवाई करून ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य होता, असेही ते म्हणाले.
मादुरोंना आज न्यायालयात हजर केले जाणार
व्हेनेझुएलाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमली पदार्थांशी संबंधित दहशतवादाच्या आरोपांखाली सोमवारी पहिल्यांदाच अमेरिकन न्यायालयात हजर केले जाणार आहे.
व्हेनेझुएलातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर
अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये काहीजणांना आनंद, तर काहीजणांच्या मनात भीती असे संमिश्र वातावरण आहे. मात्र, त्या देशातील स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. अमेरिकी कारवाईनंतर व्हेनेझुएलातील अनेक दुकाने, रेस्टॉरंट आणि चर्च काही दिवस बंद होती. पण, आता हळूहळू या सर्व गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईत क्युबाचे अनेक लोक ठार झाले. मरण पावलेल्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी क्युबाने २ दिवसांचा दुखवटा जाहीर केला.
क्युबातील ३२ अधिकाऱ्यांचा मृत्यू
हवाना : गेल्या आठवड्यात व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईत आमच्या ३२ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा क्युबाच्या सरकारने केला आहे. व्हेनेझुएला सरकारने केलेल्या विनंतीवरून त्या देशात क्युबाचे लष्कर व पोलिस दलातील अधिकारी एका मोहिमेवर होते. त्यावेळी ही घटना घडली.
क्युबाच्या सरकारी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली. मात्र, ही मोहीम नेमकी कशासाठी होती हे क्युबाने स्पष्ट केलेले नाही. क्युबा हा व्हेनेझुएला सरकारचा घनिष्ट मित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारवायांमध्ये मदत करण्यासाठी क्युबा तिथे आपले लष्कर व पोलिस दल पाठवत आला आहे.