"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:15 IST2025-07-21T19:15:31+5:302025-07-21T19:15:59+5:30
United State-India Relation: गेल्या काही दिवसांपासून भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. याचदरम्यान आता अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतासह इतर काही देशांना धमकी दिली आहे.

"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. याचदरम्यान आता अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतासह इतर काही देशांना धमकी दिली आहे. रशियाकडून तेलाची आयात करण्याच्या मुद्द्यावरून लिंडसे ग्राहम यांनी भारत, ब्राझील आणि चीनला धमकी दिली आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफ लावणार आहेत, असे सांगितले. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणं सुरू ठेवलं तर आम्ही तुम्हाला बरबाद करू अशी धमकी त्यांनी या देशांना दिली आहे.
युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र या निर्बंधांना झुगारून भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांनी रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवली होती. रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीमध्ये या तिन्ही देशांची भागीदारी ८० टक्क्यांच्या आसपास आहे. दरम्यान, हे देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने व्लादिमीर पुतीन यांना युद्ध सुरू ठेवणं शक्य होत आहे, तसेच युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना धक्का बसत आहे, असा दावा लिंडसे ग्राहम यांनी यांनी केला. दरम्यान, जर भारत, चीन आणि ब्राझीलने रशियाकडून तेल खरेदी करणं सुरू ठेवलं तर आम्ही त्यांना बरबाद करू, अशी धमकीही लिंडसे ग्राहम यांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लिंडसे ग्राहम म्हणाले की, मी भारत, चीन आणि ब्राझीलला हेच सांगू इच्छितो की, जर तुम्ही रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशियाकडून स्वस्तात मिळणारं तेल खरेदी करत राहिलात तर आम्ही तुम्हाला बरबाद करू. तुमच्या अर्थव्यवस्थेला बरबाद करू. कारण तुम्ही जे काही करत आहात तो रक्तामधून कमावलेला पैसा आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, ट्रम्प प्रशासन या प्रश्नी निर्णायक कारवाई करण्यास सज्ज आहे. तसेच पुतीन यांना युद्ध थांबवण्यासाठी ५० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच त्याचं पालन झालं नाही तर कठोर निर्बंध लादले जाणार आहे. त्यात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना निर्बंधांचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.