"जग तिसऱ्या महायुद्धाजवळ, मी ते रोखणार"! डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 06:50 IST2025-01-21T06:50:04+5:302025-01-21T06:50:32+5:30
Donald Trump News: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री त्यांच्या शपथविधी समारंभाच्या आधी वॉशिंग्टनमध्ये विजयी भाषण दिले. यादरम्यान त्यांनी जगात तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले.

"जग तिसऱ्या महायुद्धाजवळ, मी ते रोखणार"! डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री त्यांच्या शपथविधी समारंभाच्या आधी वॉशिंग्टनमध्ये विजयी भाषण दिले. यादरम्यान त्यांनी जगात तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले. जग तिसऱ्या महायुद्धाच्या अगदी जवळ आल्याचा दावा त्यांनी केला.
इस्रायल व हमासमधील युद्धबंदीचे श्रेयही ट्रम्प यांनी घेतले. ते म्हणाले की, हा ट्रम्प इफेक्ट आहे. त्यांच्या निवडणुकीतील विजयानंतर अवघ्या ३ महिन्यांतच गाझामध्ये युद्धबंदी झाली. ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये पसरलेला अराजकता थांबवण्यात येईल, असे सांगितले. आपल्या देशासमोरील प्रत्येक संकटाचे निराकरण करण्यासाठी ऐतिहासिक वेगाने आणि ताकदीने काम करेन. याचा प्रारंभ मेक्सिकन सीमा सील करण्यापासून सुरू केली जाईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांचे हे भाषण कॅपिटल वन अरेना येथे झाले. यावेळी हे मैदान खचाखच भरलेले होते. याशिवाय, कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्येने लोक बाहेर उभे होते. (वृत्तसंस्था)
ही आश्वासने पूर्ण करणार?
१. सीमा बंद करून भिंत बांधणार आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबविणार.
२. पश्चिम आशिया आणि युरोपमधील अर्थव्यवस्था यावर मार्ग काढणार.
३. रशिया-युक्रेन युद्ध थांबविणार.
४. महागाई पूर्णपणे संपविणार.
ट्रम्प म्हणाले...
आम्ही इतिहासातील सर्वांत मोठी हद्दपारी मोहीम सुरू करणार आहोत.
उद्यापासून आपण अमेरिकन ताकद, समृद्धी, प्रतिष्ठा आणि अभिमानाचा एक नवीन दिवस सुरू करणार आहोत.
आमच्या शाळांमध्ये देशभक्तीची भावना पुन्हा जागृत करू. डाव्यांना हाकलून लावू. आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांच्यासाठी पंतप्रधान मोदींचे पत्र घेऊन गेले भारताचे मंत्री जयशंकर
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पत्र अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी घेऊन गेले आहेत.
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात जयशंकर विशेष दूत म्हणून पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची उपस्थिती सरकार प्रमुखांच्या शपथविधी समारंभांना उपस्थित राहण्यासाठी विशेष दूत पाठविण्याच्या भारताच्या सामान्य परंपरेनुसार आहे.
तीन लग्न आणि पाच मुले
ट्रम्प यांनी चेक ॲथलीट आणि मॉडेल इव्हाना झेलनिकोवाशी लग्न केले, परंतु १९९० मध्ये तिला घटस्फोट दिला. इव्हानापासून त्यांना तीन मुले आहेत. डोनाल्ड जुनियर, इवांका आणि एरिक अशी त्यांची नावे आहेत. यानंतर ट्रम्प यांनी १९९३ मध्ये अभिनेत्री मार्ला मपल्सशी लग्न केले, परंतु त्यांचा १९९९ मध्ये घटस्फोट झाला. यात त्यांना एक मूल झाले असून, तिचे नाव टिफनी आहे. ट्रम्प यांची सध्याची पत्नी मेलानिया ही एक माजी स्लोव्हेनियन मॉडेल आहे. ट्रम्प यांनी तिच्याशी २००५ मध्ये लग्न केले होते. यातून त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव बॅरन विल्यम ट्रम्प असे आहे.
१०० हून अधिक आदेश
शपथ घेतल्यानंतर, ट्रम्प इमिग्रेशन, सीमा सुरक्षा, ऊर्जा आणि प्रशासनाशी संबंधित १०० हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करतील. कार्यकारी आदेश म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी एकतर्फी जारी केलेले आदेश. या आदेशांना कायद्याचे बळ आहे. यासाठी काँग्रेसच्या मंजुरीची आवश्यकता नाही. तथापि, त्यांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. पहिल्या दिवशी सर्वाधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याचा विक्रम सध्या बायडेन यांच्या नावावर आहे.
भारतीयाने बनविला ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा ‘हिरा’
सुरत : सुरतमधील एका कंपनीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्याच्या आकाराचा हिरा बनवला आहे. ग्रीनलॅब डायमंड्सने ट्रम्प यांच्या चेहऱ्यासारखा दिसणारा हा ४.३० कॅरेटचा प्रयोगशाळेत वाढवलेला हिरा तयार केला आहे. त्याची नेमकी किंमत जाहीर करण्यात आली नसली, तरी त्याची दुर्मीळ रचना पाहता याची किंमत २० लाखांपेक्षा जास्त असल्याचे समजते.
जगात तणाव वाढणार का?
ट्रम्प कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनविण्याबाबत आणि ग्रीनलँड व पनामा कालव्यावर नियंत्रण मिळवण्याबाबत बोलले आहेत. त्यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे.