युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:17 IST2025-08-21T14:16:27+5:302025-08-21T14:17:58+5:30

रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोनने मोठे हवाई हल्ले केले.

The war is not going to stop! Russia's biggest attack on Ukraine so far; 40 missiles fired at once | युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र

युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध साडेतीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांकडून शांततेचे प्रयत्न सुरू असले तरी हवाई हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. शांतता चर्चेच्या प्रयत्नांदरम्यानच रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर रात्रभर ड्रोन हल्ले केले आहेत.

२० ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियाच्या ताब्यात असलेल्या पॉवर प्लांटवर ड्रोन हल्ला केल्याचा आणि वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून २१ ऑगस्ट रोजी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोनने मोठे हवाई हल्ले केले. अमेरिकेसोबत शांतता चर्चा सुरू असतानाच हे हल्ले झाल्याने तणाव वाढला आहे. रिवने ओब्लास्टमध्ये तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे. रशियाने बॉम्बर विमाने आणि ड्रोनचा वापर केल्याने युक्रेनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कीवमध्ये ड्रोन हल्ले
युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने गुरुवारी रात्रभर युक्रेनवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. युक्रेनच्या हवाई दलाने याला रशियाने अलीकडच्या आठवड्यांमध्ये केलेला सर्वात मोठा हल्ला म्हटले आहे.

रशियाने एकूण ५७४ ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रे डागल्याचे युक्रेनने सांगितले. या हल्ल्यांमध्ये किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. युक्रेनच्या हवाई संरक्षण दलांनी यापैकी ५४६ ड्रोन आणि ३१ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली.

रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'जर युक्रेनला पाश्चात्त्य देशांनी दिलेल्या सुरक्षा हमीच्या चर्चेत रशियाला सामील केले नाही, तर हे सर्व प्रयत्न निरर्थक ठरतील.'

ते पुढे म्हणाले, 'पाश्चिमात्य देशांना, विशेषतः अमेरिकेला चांगलेच माहीत आहे की रशियाच्या सहभागाशिवाय सुरक्षा हमीवर गंभीर चर्चा करणे म्हणजे वास्तवापासून दूर राहणे आहे.' नाटो देशांचे उच्च अधिकारी युक्रेनच्या सुरक्षा हमी आणि शांतता करारावर व्हर्च्युअल बैठकीत चर्चा करत असतानाच लावरोव यांनी हे विधान केले आहे.

Web Title: The war is not going to stop! Russia's biggest attack on Ukraine so far; 40 missiles fired at once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.