६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:30 IST2025-10-10T05:30:26+5:302025-10-10T05:30:50+5:30
दोन्ही बाजूंना शांतता पाळण्याचे केले आवाहन

६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
जेरुसलेम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीसाठी सुचवलेल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर पॅलेस्टाइन व इस्रायलने सहमती दर्शवली आहे. या योजनेनुसार इस्रायलचे २० ओलीस नागरिक सोडण्यास हमास राजी झाला असून त्या बदल्यात इस्रायलकडून पॅलेस्टाइन बंदीवानांची सुटका केली जाणार आहे.
हमासच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन हजार नागरिक इस्रायलच्या तुरुंगात आहेत. यातील १७०० नागरिक सध्याच्या संघर्षात इस्रायलने ताब्यात घेतले आहेत तर सुमारे २५० नागरिक दीर्घकाळाचा तुरुंगवास भोगत आहेत. इस्रायलचे कॅबिनेट लवकर या योजनेला संमती देणार आहे. या निर्णयामुळे २ वर्षांपासून जगण्यामरण्याच्या संघर्षात अडकलेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात आहे.
गाझामधून शुक्रवारपासून इस्रायलचे सैन्य माघार घेणार
ट्रम्प यांच्या शांतता योजनेनुसार इस्रायल शुक्रवारपासून आपले पूर्ण सैन्य गाझा पट्टीतून माघार घेण्यास सुरूवात करणार आहे. तसेच गाझा पट्टीत वैद्यकीय व अन्नसेवा लवकर पोहोचविण्यासाठी पाच सीमा खुल्या केल्या जाणार आहेत. सध्या इस्रायलचे सैन्य गाझा शहर, खान युनिस, राफा आणि उत्तर गाझा भागात तैनात आहे. गाझा सध्या बेचिराख झाले आहे.
गाझा शांतता योजनेचे मोदींकडून स्वागत
गाझा पट्टीत शांतता पाळण्याच्या ट्रम्प प्रस्तावाचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले आहे. ट्रम्प यांच्या या प्रस्तावाचे आपण स्वागत करत असून, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कणखर नेतृत्वाचेही हे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. मोदी यांच्याव्यतिरिक्त तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसि, चीनचे परराष्ट्र खाते, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ, जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांना प्रस्तावास पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या आहेत.