‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:15 IST2025-07-25T08:15:20+5:302025-07-25T08:15:41+5:30
सौदी अरबचे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊद हे ‘स्लिपिंग प्रिन्स’ या नावानं प्रसिद्ध होते.

‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
‘स्लिपिंग प्रिन्स’. सौदी अरबचे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊद हे ‘स्लिपिंग प्रिन्स’ या नावानं प्रसिद्ध होते. गेली अनेक वर्षे सौदीच्या जनतेचं त्यांच्याकडे लक्ष होतं आणि त्यांच्यासाठी सातत्यानं ते दुआही करीत होते. याच स्लिपिंग प्रिन्सचं वयाच्या ३६व्या वर्षी नुकतंच निधन झालं. ते आता ‘झोपेतून’ कधीच उठणार नाहीत म्हणून राजघराण्याला, त्यांच्या वडिलांना आणि सौदीच्या जनतेला अतीव दु:ख झालं आहे.
बाप-बेट्याच्या नात्याची आणि त्यांच्यातील अतूट प्रेमाची ही एक अनोखी कहाणी आहे. गेली वीस वर्षे प्रिन्स अल वलीद ‘झोपलेले’ होते. कोमात गेले होते. तेे झोपेतून कधीतरी उठतील, असं त्यांच्या वडिलांना आणि सौदीच्या जनतेलाही अतिशय उत्कटपणे वाटत होतं. प्रिन्स अल वलीद हे लंडनच्या एका सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. २००५ची ही गोष्ट. त्यावेळी ते केवळ १५ वर्षांचे होते. एका भीषण कार अपघातात ते अतिशय गंभीर जखमी झाले, त्यांना ब्रेन हॅमरेज झाले आणि ते कोमात गेले. त्यांना वाचवण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आलं. ते वाचावेत यासाठी जगभरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. उपचारांना ते प्रतिसाद देतील आणि काेमातून बाहेर येतील असं डॉक्टरांना आणि त्यांच्या वडिलांना, प्रिन्स खालीद बिन तलाल यांनाही वाटत होतं. कालांतरानं डॉक्टरांच्याही आशा मावळल्या; पण पित्याची जिद्द आणि प्रेम अतूट होतं. प्रिन्स अल वलीद यांचे वडील प्रिन्स खालीद यांनी मुलावरील उपचार बंद करण्यास आणि त्याचं व्हेंटिलेटर काढण्यास साफ नकार दिला. प्रिन्स या गाढ झोपेतून कधी ना कधी नक्की बाहेर येतील यावर त्यांचा विश्वास होता. त्यांचं म्हणणं होतं, ‘जिंदगी अल्लाह की देन है और वही उसे ले सकता है।..’
लंडनमध्ये अपघात झाल्यानंतर आणि तिथे उपचार केल्यानंतर प्रिन्सला रियाधच्या किंग अब्दुल अजीज मेडिकल सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यानंतर त्यांना रियाधच्या महालातील एका स्पेशल रूममध्ये अखेरपर्यंत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी २४ तास डॉक्टर, नर्स आणि मेडिकल सपोर्ट उपलब्ध होता.
दरम्यानच्या काळात कोमात गेलेल्या प्रिन्स यांनी जीवनाची आशा कधी दाखवलीच नाही, असं नाही. अधूनमधून त्यांनी थोडीफार हालचाल केली, उपचारांना थोडासा प्रतिसाद दिला, त्यामुळे वडील प्रिन्स खालीद आणि सौदीच्या जनतेच्या आशा पल्लवित व्हायच्या. आपला राजकुमार झोपेतून कधीतरी उठेल आणि पुन्हा आपल्यात येईल, असं त्यांना वाटायचं, पण असं होणं नव्हतं..
या संपूर्ण वीस वर्षांच्या काळात बापाचं मुलावर असलेलं प्रेम जगाला पाहायला मिळालं. वडील प्रिन्स खालीद अनेकदा रात्र रात्र आपल्या मुलाच्या उशाशी बसलेले, त्याच्या डोक्यावरून, त्याच्या छातीवरून हात फिरवत असायचे. डॉक्टरांनी आशा सोडली; पण त्यांच्या डोळ्यांतली आशा कधी विझली नाही, त्यांच्या आत्मविश्वासाला कधीच तडा गेला नाही.
प्रिन्सच्या निधनानं सौदीच्या जनतेच्याही हृदयात कालवाकालव झाली आहे. संयम, विश्वास आणि प्रेमाचं अनोखं उदाहरण असलेले प्रिन्स अल वलीद यांचे वडील प्रिन्स खालीद यांच्या सांत्वनासाठी लोक त्यांना हजारोनं शोकसंदेश पाठवत आहेत. तेवढंच आता त्यांच्या हातात आहे...