‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 08:02 IST2025-09-11T08:00:57+5:302025-09-11T08:02:12+5:30
kohinoor diamond darya-i-noor: याच ‘कोहिनूर’ हिऱ्याला एक ‘बहीण’ही आहे, हे तुम्हाला माहीत आहे? कोहिनूरच्या या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’! हा हिराही तितकाच मूल्यवान आणि आकर्षक आहे.

‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’
Darya i Noor diamond: भारताच्या ‘कोहिनूर’ हिऱ्याचं आजही जगभरात नाव घेतलं जातं. ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात असलेला हा हिरा अनेक वर्षे त्यांच्या मुकुटांत स्थिरावला. हा हिरा आणण्याचे बरेच प्रयत्न झाले; पण तो अजूनही आपल्याकडे येऊ शकलेला नाही. सध्या तो ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये ठेवलेला आहे.
याच ‘कोहिनूर’ हिऱ्याला एक ‘बहीण’ही आहे, हे तुम्हाला माहीत आहे? कोहिनूरच्या या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’! हा हिराही तितकाच मूल्यवान आणि आकर्षक आहे. सध्या तो बांगलादेशच्या ताब्यात आहे आणि ढाका येथील एका बँकेच्या तिजोरीत तो ठेवलेला आहे. पण ११७ वर्षे झाली, हा हिरा प्रत्यक्षात कोणी पाहिलेलाच नाही. कारण १९०८ साली ही तिजोरी सील करण्यात आली. त्यानंतर ती उघडलेलीच नाही !
हा हिरा याच बँकेत आणि त्याच तिजोरीत आहे का, हेही निश्चितपणे माहीत नाही; पण आता ११७ वर्षांनंतर ही तिजोरी बांगला देश सरकार पुन्हा उघडणार आहे. त्यावेळी कदाचित या हिऱ्याचं दर्शन जगाला पुन्हा होऊ शकेल. हे दोन्ही हिरे भारतातून नेले गेले होते आणि भारताच्या गोलकोंडा खाणीतून ते निघाले होते. ‘दरिया-ए-नूर’ची सध्याची किंमत सुमारे १३ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ११५ कोटी रुपये) आहे.
दरिया-ए-नूरचं एक रेखाचित्र १८५१ मध्ये पारसी रत्नांच्या प्रदर्शनात दाखवण्यात आलं होतं. दरिया-ए-नूर म्हणजे ‘प्रकाशाची नदी’. हा २६ कॅरेटचा हिरा आहे, जो ‘टेबल-कट’ म्हणजे त्याच्या आयताकृती आणि सपाट पृष्ठभागासाठी ओळखला जातो.
हा हिरा एका सोन्याच्या बाजूबंदामध्ये बसवलेला आहे, ज्याच्या आजूबाजूला प्रत्येकी सुमारे ५ कॅरेटचे दहा लहान हिरे आहेत. या हिऱ्याचं वैशिष्ट्य केवळ त्याचं सौंदर्य नाही, तर त्याचं ऐतिहासिक महत्त्वही फार मोठं आहे. हा हिरा मराठा राजे, मुघल सम्राट आणि शीख शासकांच्या ताब्यात होता. ब्रिटिशकाळात तो अनेक राजांच्या हातांतून गेला.
‘दरिया-ए-नूर’ अजूनही बांगलादेशात आहे का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. काही जाणकारांच्या मते हा हिरा बँकेच्या तिजोरीत असण्याची शक्यता आहे, जी १९०८ पासून बंद आहे. काही माध्यमांच्या मते ही तिजोरी सर्वांत शेवटी १९८५ मध्ये उघडण्यात आली होती. त्यावेळी या हिऱ्याचं अस्तित्व स्पष्ट झालं होतं. मात्र, २०१७ मध्ये काही अहवालांनुसार हा हिरा गायब झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
ढाकाचे नवाब सलीमुल्लाह यांचे पणतू ख्वाजा नईम मुराद यांना मात्र हा हिरा तिथेच असण्याची आशा आहे. नईम मुराद यांच्या मते, हा हिरा १०८ इतर मौल्यवान वस्तूंसह तिजोरीत ठेवलेला होता. त्यामध्ये सोन्या-चांदीची तलवार, हिऱ्यांनी सजवलेली फेज (टोपी) आणि एका फ्रेंच महाराणीचा स्टार ब्रॉच यांचा समावेश होता.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शौकत अली खान यांचं म्हणणं आहे, ही तिजोरी अजूनही सील आहे. काही वर्षांपूर्वी एक चौकशी पथक आलं होतं, पण त्यांनी तिजोरी उघडली नव्हती, फक्त दार पाहिलं होतं.
काही जाणकारांचं म्हणणं आहे, १९४७ मधील भारताच्या फाळणीदरम्यान किंवा १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या काळात हा हिरा गायब झाला आणि नंतर बांगलादेशात पोहोचला. ‘दरिया-ए-नूर’ नावाचा एक दुसरा हिरा सध्या इराणची राजधानी तेहरानमध्ये आहे. मात्र बांगलादेशातील दरिया-ए-नूरपेक्षा तो वेगळा आहे.