किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 08:39 IST2025-09-08T08:38:32+5:302025-09-08T08:39:14+5:30
ही भेट होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातली. हे दोन्ही नेते अमेरिकेसह जगातील कोणालाच भीक घालत नाहीत, आपल्या मनाला वाटेल ते करत असतात.

किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान सातत्यानं जगातील अनेक देशांना भेटी देत असतात. यात नवीन तसं काही नाही. दुसऱ्या राष्ट्रांशी संबंध वृद्धिंगत करण्याचा, व्यापारी करार करण्याचा, आर्थिक देवाण-घेवाणीचा हा तसा ‘राजमार्ग’. पण गेल्या आठवड्यात चीनची राजधानी बीजिंग येथे ज्या दोन ‘लहरी’ नेत्यांची भेट झाली, त्यामुळे मात्र त्याकडे जगाचं लक्ष लागून आहे.
ही भेट होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातली. हे दोन्ही नेते अमेरिकेसह जगातील कोणालाच भीक घालत नाहीत, आपल्या मनाला वाटेल ते करत असतात, याबद्दल त्यांची ख्याती आहे. या दोन्ही नेत्यांची बीजिंगला बंद दाराआड चर्चा झाली. त्यावेळी त्यांच्यात काय बेत शिजला हे अजून गुपित आहे, पण त्यावेळी जे काही घडलं त्यानंही जगाचे कान टवकारले आहेत.
असं घडलं तरी काय या भेटीत? पहिली गोष्ट म्हणजे दोन्हीही नेते आणि त्यांचे सुरक्षारक्षक या भेटीच्या वेळी अतिशय सावध होते. कुठलाही ‘दगाफटका’ होऊ नये यासाठी ते सज्ज होते. त्यामुळेच पुतीन आणि किम जोंग उन यांची भेट होताक्षणी या भेटीत किम जोंग यांनी पाणी पिण्यासाठी वापरलेला ग्लास त्यांच्या बॉडीगार्ड्सनी तातडीनं ताब्यात घेतला. एवढंच नाही, किम जोंग उन ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची आणि ज्या टेबलचा त्यांनी वापर केला, तो टेबलही अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ करण्यात आला. किम यांच्या हाताचे कोणतेही ठसे कुठेही राहू नयेत याची काळजी घेण्यात आली.
तज्ज्ञांच्या मते, ही दक्षता चीन व रशियाच्या गुप्तचर कारवायांपासून बचाव करण्यासाठी असू शकते किंवा किम आपली आरोग्यविषयक माहिती लपवू इच्छित असावेत. एखाद्या नेत्याच्या फिंगरप्रिंट आणि मल-मूत्रातून त्याचा डीएनए आणि आरोग्यविषयक गोपनीय माहिती समजू शकते. किम जोंग उन यांच्या आरोग्याबाबतची माहिती अत्यंत गुप्त राखली जाते. मध्यंतरी काही काळ सार्वजनिक जीवनातून ते अचानक गायब झाले होते. त्यांना गंभीर आजारानं ग्रासलं होतं, अशा बातम्या त्यावेळी पसरल्या होत्या; पण त्यांना नेमकं काय झालं, हे जाहीर करण्यात आलं नव्हतं. आपले हे ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं आणि त्याची कुठेही, कसलीही वाच्यता होऊ नये, असे किम जोंग उन यांना वाटत असावं.
फिंगरप्रिंटच्या साहाय्याने कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीय कागदपत्रांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. फिंगरप्रिंटचा वापर फोन, लॅपटॉप आणि गुप्त ठिकाणी प्रवेशासाठी केला जातो. कोणत्याही देशाच्या नेत्याचं आरोग्य ‘टॉप सीक्रेट’ मानलं जातं. किम जोंग उन तर त्याबाबत अधिकच काळजी घेतात. ही माहिती बाहेर आल्यास शत्रूराष्ट्र त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकता.
त्यामुळे अनेक देशांच्या सुरक्षा यंत्रणा परदेश दौऱ्यादरम्यान आपल्या नेत्यांचे फिंगरप्रिंट पुसतात आणि त्यांचे मल-मूत्र परत नेतात. ट्रम्प आणि पुतीन यांची गेल्या महिन्यात अलास्कामध्ये भेट झाली होती. यावेळी पुतीन यांचे बॉडीगार्ड्सही एक खास सुटकेस घेऊन आले होते, ज्याला ‘पूप सुटकेस’ म्हणतात. पुतीन यांचे मल-मूत्र गोळा करण्यासाठी ही सुटकेस आणण्यात आली होती.