“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:58 IST2025-05-08T09:56:38+5:302025-05-08T09:58:21+5:30

Operation Sindoor: गेली ३ वर्षे रशियाशी सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबलेले नसून, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर युक्रेनने भारताला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

the ministry of foreign affairs of ukraine releases a statement over the escalation of tensions between india and pakistan after operation sindoor | “भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन

“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन

Operation Sindoor: पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. कर्त्या माणसांवर दहशतवाद्यांनी घातलेल्या घाल्याने अवघा देश पेटून उठला. त्या कुंकवाची आण घेऊन भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भीम पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला. यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. बहुतांश देशांनी भारताला भक्कम पाठिंबा जाहीर केला असून, भारताने केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. यातच फेब्रुवारी २०२२ पासून रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनने भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. 

भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण व पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतला. भारताने केलेल्या हल्ल्यात आमच्या निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. अमेरिका, इस्रायल, इंग्लंड यांसारख्या देशांनी भारताचे समर्थन केले आहे. गेल्या ३ वर्षांपासून रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्याला अद्याप यश येताना दिसत नाही. कुणीच माघार घ्यायला तयार नाही. अशातच युक्रेनने भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचे आणि संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

भारत-पाकने संयम राखावा

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याबद्दल युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दोन्ही पक्षांना संयम राखण्याचे आणि अर्थपूर्ण राजनैतिक संवाद साधण्याचे आवाहन करत आहोत. दक्षिण आशियात सुरक्षा परिस्थिती आणखी बिघडू शकेल अशा कृती टाळणे आणि त्याऐवजी सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्याला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युक्रेन शांतता आणि स्थिरता पुनर्स्थापित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व उपाय योजना करण्याला आणि तणाव त्वरित कमी करण्यासाठी समर्थन देतो. युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालय पुढील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय उपक्रमांना आणि प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असे युक्रेनने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले. भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी गोळीबारात सर्वाधिक नुकसान पूंछ जिल्ह्यात झाले आहे. भारतीय सैन्य गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत आहे. शत्रूच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या बाजूने मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

Web Title: the ministry of foreign affairs of ukraine releases a statement over the escalation of tensions between india and pakistan after operation sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.