‘काबूल’ चहाचा कप पाकिस्तानला अजूनही भोवतोय! गोष्ट फैज हमीदच्या फोटोची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:45 IST2025-11-08T09:44:47+5:302025-11-08T09:45:21+5:30
फैज हमीद पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे (आयएसआय) प्रमुख लेफ्टनंट जनरल होते

‘काबूल’ चहाचा कप पाकिस्तानला अजूनही भोवतोय! गोष्ट फैज हमीदच्या फोटोची...
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननंअफगाणिस्तानच्या सत्तेवर पुन्हा एकदा कब्जा केला. त्यावेळी एक फोटोनं जगभरात आणि त्यातही पाकिस्तानात खूप खळबळ उडाली होती. तो फोटो होता पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे (आयएसआय) तत्कालीन प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांचा.
फैज हमीद हे इतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत काबूलमधल्या एका हॉटेलमध्ये चहा पीत असतानाचा तो फोटो होता. आता चहा पिणं वाईट आहे का? लष्करी अधिकाऱ्यांनी चहा पिऊ नये का? त्यांनी हॉटेलात जाऊ नये का?.. पण या चहा पिण्याला, त्यातही पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखानं आणि अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या एका हॉटेलात चहा पिण्याला एक ऐतिहासिक, सामाजिक, तत्कालीन आणि भविष्याच्या दृष्टीनंही खूप महत्त्व होतं. कारण या एका घटनेनं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा इतिहास अनेक बाबतीत नव्यानं लिहिला गेला. त्याचा भारतावर आणि जगावरही मोठा परिणाम झाला.
पाकिस्ताननं अफगाणिस्तानला अर्थात तालिबान्यांना बरीच मदत केली होती. किंबहुना अफगाणिस्तातील तालिबान्यांना पाकिस्ताननंच पोसलं होतं. पाकिस्तानच्या लष्करानं, लष्करी अधिकाऱ्यांनी आपली रसद पुरवून तालिबान्यांना बळ दिलं होतं. त्याच बळावर तालिबानी नंतर मोठे झाले. ते इतके ‘मोठे’ झाले की त्यानंतर पाकिस्तान्यांनाही ते डोईजड झाले आणि त्यांच्याच उरावर बसले.
काबूलमधल्या हॉटेलात लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या हातातला चहाचा तो कप म्हणजे तालिबानी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या साट्यालोट्याचं नुसतंच प्रतीक नव्हतं, तर त्याचा सज्जड पुरावा होता. पाकिस्ताननं आपल्या मदतीचा हात त्यांच्यासाठी पुढे केला आणि दोन्ही देशांची दारं दहशतवादाच्या प्रवेशासाठी खुली झाली. चहाच्या या कपाचं वादळ आजही पाकिस्तानवर घोंघावतं आहे.
याच घटनेवर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी नुकतंच संसदेत सांगितलं, त्या ‘चहा’ची किंमत आजही पाकिस्तानला मोजावी लागत आहे. याच एक कप चहानं अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेचं दार पुन्हा उघडलं. त्याचमुळे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेचे पाकिस्तानवरील हल्ले वाढले.
त्यांच्या म्हणण्यानुसार ही एक गंभीर चूक होती, जी पुन्हा कधीही होऊ नये. तालिबान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला आपल्या सुरक्षेत प्रचंड वाढ करावी लागली. टीटीपी, फितना अल-खवारिज आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी संघटनांनी अफगाण भूमीवरून पाकिस्तानविरुद्ध आपल्या कारवाया सुरु ठेवल्या. तालिबाननं त्यांना आश्रयही दिला. डार यांनी माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारच्या निर्णयांना याबाबत जबाबदार ठरवलं.
तालिबानचा मुख्य शत्रू अमेरिका आणि नाटो सैन्य होते. आजही आहे. पाकिस्ताननं वारंवार अमेरिकेला मदत केली आणि तालिबानविरुद्ध ‘वॉर ऑन टेरर’मध्ये भाग घेतला म्हणून टीटीपीचा पाकिस्तानवर राग आहे. पाकिस्तानवर त्यांनी अनेक हल्लेही केले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अलीकडे तणावही वाढला आहे. चहाच्या कपातलं हे दहशतवादाचं वादळ आता पाकिस्तानच्या अंगाशी आलं आहे आणि जगभर ते घोंघावतं आहे.