‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 23:54 IST2025-12-25T23:52:02+5:302025-12-25T23:54:20+5:30
Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाताळानिमित्त देशवासियांना संबोधित करताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं नाव न घेता त्यांच्या मृत्यूची कामना केली आहे.

‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना
जवळपास चार वर्षे लोटत आली तरी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या विस्तारवादी धोरणामुळे युक्रेन युद्धाच्या आगीत होरपळून निघत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाताळानिमित्त देशवासियांना संबोधित करताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं नाव न घेता त्यांच्या मृत्यूची कामना केली आहे.
झेलेन्स्की देशवासियांना संबोधित करताना म्हणाले की, युक्रेनमधील जनतेच्या प्राचीन समजुतीनुसार नाताळाच्या रात्री स्वर्गाचे दरवाजे उघडतात. तसेच त्यावेळी तुम्ही तुमच्या मनातील जी इच्छा व्यक्त करता ती पूर्ण होते. त्यामुळे आज आम्ही एकच संयुक्त इच्छा व्यक्त करतोय की आम्हा सर्वांसाठी तो या जगात राहू नये. यावेळी झेलेन्स्की यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा रोख पुतीन यांच्या दिशेनेच होता.
नाताळाच्या पूर्वसंध्येला रशियाने युक्रेनमधील अनेक भागांवर मोठा क्षेपणास्र हल्ला केला होता. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला. तसेच युक्रेनमधील विजपुरवठा खंडित झाला. याशिवाय नाताळादिवशीदेखील रशियाने यु्क्रेनवर १३१ ड्रोन डागले होते. युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने यापैकी बहुतांश ड्रोन नष्ट केले. मात्र २२ ड्रोन १५ वेगवेगळ्या ठिकाणी आदळून मोठं नुकसान झालं.
झेलेन्स्की यांनी या हल्ल्यावरून रशियावर टीका केली. नाताळाच्या पूर्वसंध्येला आपण कोण आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. त्यांचा हा हल्ला ईश्वर-विहीन हल्ला होता, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.