"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:45 IST2025-09-04T12:42:26+5:302025-09-04T12:45:42+5:30
Putin Trump Latest News: गेल्या काही दिवसात अमेरिकेने चीन आणि भारताविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.

"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
Putin on Trump: अमेरिकेचे भारत आणि चीनसोबत संबंध ताणले गेले आहेत. विशेषतः भारताविरोधात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या ताणल्या गेलेल्या संबंधावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भाष्य केले आहे. अमेरिकाचीन आणि भारतासोबत अशा पद्धतीने बोलू शकत नाही, अशा शब्दात पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावले.
पुतीन यांनी चीनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून भारत आणि चीनवर आणल्या जात असलेल्या दबावाबद्दल भूमिका मांडली.
पुतीन म्हणाले, "तुमच्याकडे भारतासारखा देश आहे. त्या देशाची लोकसंख्या १.५ अरब आहे. चीन एक शक्तिशाली अर्थव्यवस्था असणारा देश आहे. पण, त्या देशाचे काही स्थानिक राजकीय कार्यपद्धती आहेत."
परकीय राजवटीचा सामना
"तुम्हाला याचा विचार करावा लागेल की, त्या देशांचे नेतृत्व कसे आहे. या देशांचा इतिहासही असा राहिला आहे की, त्यांनी कठीण काळ बघितलेला आहे. दीर्घकाळ परकीय राजवटीचा सामना करावा लागलेला आहे. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, त्यांच्यापैकी कुणी नरमाई दाखवली तर त्यांची राजकीय कारकीर्द संपेल", असे भाष्य पुतीन यांनी केले आहे.
पुतीन ट्रम्प यांना उद्देशून म्हणाले, "राजवटींचा काळ आता संपलेला आहे. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, तुम्ही या देशांसोबत अशा पद्धतीने बोलू शकत नाही", अशा शब्दात पुतीन यांनी अमेरिकेला सुनावलं.
"शेवटी सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. सर्वकाही पूर्वपदावर येईल आणि पुन्हा राजकीय भाषणबाजी होणार नाही", असेही पुतीन म्हणाले.
युक्रेन-रशियाच्या युद्धाचा मुद्दा पुढे करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लादला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, असा आग्रह ट्रम्प यांचा आहे. अमेरिकेच्या याच टॅरिफ धोरणारनंतर पुतीन यांनी त्यांची भूमिका मांडली.