बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 08:34 IST2026-01-10T08:34:16+5:302026-01-10T08:34:57+5:30
माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या निधनानंतर, आता पक्षाची कमान त्यांचे सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
बांगलादेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या निधनानंतर, आता पक्षाची कमान त्यांचे सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत रहमान यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तब्बल १७ वर्षांच्या वनवासानंतर मायदेशी परतलेल्या रहमान यांच्याकडे आता आगामी निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
आईच्या निधनानंतर रिक्त पदावर नियुक्ती
बांगलादेशच्या तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या आणि बीएनपीच्या कणखर नेत्या खालिदा जिया यांचे ३० डिसेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. पक्षाच्या घटनेनुसार, हे रिक्त पद भरण्यासाठी तातडीने राष्ट्रीय स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वसंमतीने तारिक रहमान यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
१७ वर्षांनंतर लंडनहून मायदेशी परतले
तारिक रहमान हे गेल्या १७ वर्षांपासून लंडनमध्ये स्वनिर्वासित जीवन जगत होते. २५ डिसेंबर रोजी त्यांचे बांगलादेशात पुनरागमन झाले आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्याकडे पक्षाचे सर्वोच्च पद आले आहे. २००२ मध्ये त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ संयुक्त सरचिटणीस म्हणून कामाला सुरुवात केली होती, तर २००९ मध्ये त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. आता अध्यक्ष म्हणून ते अधिकृतपणे पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.
पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार
बांगलादेशात सध्याचे राजकीय वातावरण पाहता, तारिक रहमान हे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष 'अवामी लीग'ला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले आहे. अशा परिस्थितीत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये बीएनपीला सत्तेचे प्रबळ दावेदार मानले जात असून, रहमान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
तारिक रहमान यांच्या नियुक्तीमुळे बांगलादेशच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. तरुण वर्गात रहमान यांची असलेली लोकप्रियता आणि पक्षाची मजबूत पकड यामुळे आगामी काळात बांगलादेशाला नवे नेतृत्व मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आईचा वारसा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यांच्या जोरावर रहमान बांगलादेशचा चेहरा बदलणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.