टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 08:16 AM2024-02-24T08:16:03+5:302024-02-24T08:17:40+5:30

रशिया आणि उत्तर कोरिया जगाच्या पाठीवरचे असे दोन देश जे त्यांच्या क्रूर आणि गूढ वागण्याबद्दल ओळखले जातात. हे दोन देश आंतरराष्ट्रीय राजकारणात तसे एकाकीच. या दोन देशांचं इतर देशांशी पटत नसलं तरी आपसात मात्र चांगलं पटतं असं म्हणायला भरपूर वाव आहे.

The car that Putin uses in Russia as President has been sent to Kim Jong Un as a special gift | टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह!

टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह!

जगभरात  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची चर्चा होत असतानाच उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांना पुतीन यांच्याकडून मिळालेल्या खास प्रेमाच्या भेटीचीही चर्चा होते आहे. पुतीन अध्यक्ष म्हणून रशियात जी गाडी वापरतात ती गाडी त्यांनी किम जोंग उन यांना  खास भेट म्हणून पाठवली आहे. किम यांना पुतीन यांच्याकडून मिळालेली ही गाडी रशियातील अत्यंत महागडी गाडी म्हणून ओळखली जाते.

१८ फेब्रुवारीला रशियाकडून पाठवलेली गाडी किम जोंग यांच्यापर्यंत पोहोचली असं कोरियन सेंट्रल न्यूजने जाहीर केलं. किम यांची बहीण किम यो जोंग यांनी पुतीन यांचे गाडी पाठवल्याबद्दल आभार मानले. ही भेट जरी पुतीन आणि किम यांच्यामधल्या प्रेमाची आणि मैत्रीची असली तरी या भेटीमुळे इतर देशांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. याचं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने उत्तर कोरियाला चैनीच्या वस्तू न पुरवण्याबाबत एक ठराव केला आहे. रशिया या ठरावाच्या बाजूने असतानाही पुतीन  किम जोंग उन यांना महागडी गाडी भेट देऊन या ठरावाचं उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला आहे.

या भेटीमागे वेगळं काहीतरी शिजतं आहे याचा अंदाज असल्याने दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्रालय रशिया आणि उत्तर कोरियातल्या संबंधांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये रशियात झालेल्या एका परिषदेत  किम जोंग उन आणि पुतीन यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. या भेटीनंतरच या दोघांमधले पर्यायाने रशिया आणि उत्तर कोरियातले संबंध वाढीस लागले. या परिषदेत रशिया उत्तर कोरियाला त्यांच्या उपग्रह निर्मितीत सहकार्य करेल असं पुतीन यांनी किम यांना आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी उत्तर कोरियाने हेरगिरी करणारा पहिला उपग्रह अंतराळात सोडला.

या दोन देशातील वाढती मैत्री पाश्चात्य देशांची डोकेदुखी ठरण्याची चिंता वाढू लागली आहे. या मैत्रीतून उत्तर कोरिया रशियाला प्राणघातक शस्त्रे पुरवण्याचा आणि रशिया उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला सहकार्य करण्याच्या दाट शक्यता निर्माण झाल्या आहेत. जग पुतीन आणि किम यांच्यातील मैत्रीकडे संशयाचा चष्मा लावून बघत असले तरी ‘आमचे परस्पर सहकार्य म्हणजे कोरियन द्वीपसमूहात शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी आहे’, असा दावा उत्तर कोरियाचे प्रवक्ते किम यांच्या वतीने करत आहेत.

पुतीन यांनी किम यांच्यासाठी पाठवलेली ही गाडी साधीसुधी, केवळ आलिशान आणि महागडी या कॅटेगिरीतली नसून पुतीन अध्यक्ष म्हणून रशियात जी गाडी  वापरतात त्यापैकी  आहे. किम जेव्हा रशियाला आले होते तेव्हा पुतीन यांची ‘औरस कार’ पाहून त्या कारच्या प्रेमात पडले होते. औरस कारने रशियात  पहिलीच आलिशान कार तयार केली होती. जो ही कार पाही तो त्या कारच्या प्रेमात पडे. किमही त्याला अपवाद नव्हतेच.

 पुतीन यांनी किम यांना आग्रहाने आपल्या गाडीत मागील सीटवर स्वत:जवळ बसवले होते. किम या कारमध्ये बसले, नंतर त्यांनी या गाडीचं बारकाईनं निरीक्षण केलं. हे होत असतानाच किम यांना ही गाडी भेट देण्याचा निर्णय पुतीन यांनी मनातल्या मनात घेऊन टाकला असावा. या गाडीच्या निमित्ताने  पुतीन आणि किम यांची मैत्री भविष्यात आणखी वाढणार, या मैत्रीला भविष्यात उत्तर कोरिया रशियाला युक्रेनविरुद्ध लढण्यास लष्करी साहाय्य पुरवण्याचे पंखही फुटतील कदाचित!

खरंतर मैत्री ही जगातली किती सुंदर गोष्ट  असते.  पण, ही मैत्री कोणामध्ये होते आणि का होते यावर तिचं सौदर्य अवलंबून असतं. पुतीन आणि किम जोंग उन यांच्या मैत्रीने जगाची डोकेदुखी वाढणार हे नक्कीच !

किम यांचं आलिशान गाड्यांचं प्रेम

आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियाला चैनीच्या वस्तू न पुरवण्याचा ठराव केलेला असला तरी किम यांच्या दारात मात्र परदेशातल्या आलिशान गाड्या उभ्या असतात. २०१५ ते २०१७ या काळात ८०० महागड्या गाड्या देशात आयात केल्या गेल्या. त्यातल्या बहुतेक रशियन कंपन्यांच्याच होत्या. अनेक गाड्या स्मगलिंगद्वारेही आणल्या गेल्या. किम २०१९ मध्ये रशियाला गेले होते. तेव्हा रशियात उतरल्यावर किम यांना त्यांची लिमोझिन गाडी  चालवता यावी यासाठी खास व्यवस्था केली गेली होती.

Web Title: The car that Putin uses in Russia as President has been sent to Kim Jong Un as a special gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.