इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:28 IST2025-11-20T16:28:08+5:302025-11-20T16:28:43+5:30
ब्रिटन सरकार टॅक्स धोरणांवर घेत असलेल्या अस्थिर निर्णयामुळे आणि संभाव्य 'एक्झिट टॅक्स'च्या भीतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे नरुला यांनी स्पष्ट केले.

इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
लंडन: ब्रिटनमध्ये वाढलेला टॅक्सचा बोजा (कर) आणि सार्वजनिक सेवांचा खालावलेला दर्जा यामुळे श्रीमंत ब्रिटिश-भारतीय नागरिकांच्या मोठ्या गटाने देश सोडण्यास सुरुवात केली आहे. आता £2.5 अब्ज मूल्याच्या 'इम्प्रोबेबल' या टेक कंपनीचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश हरमन नरुला यांचाही समावेश आहे. ते ब्रिटन सोडून दुबईला जात आहेत.
ब्रिटन सरकार टॅक्स धोरणांवर घेत असलेल्या अस्थिर निर्णयामुळे आणि संभाव्य 'एक्झिट टॅक्स'च्या भीतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे नरुला यांनी स्पष्ट केले.
केवळ अब्जाधीशच नव्हे, तर अनेक व्यावसायिक नागरिकही ब्रिटन सोडण्याच्या विचारात आहेत. गणपती भट नावाचे आयटी कन्सल्टंट (मूळचे बंगळूरचे) यांनी सांगितले की, "आता जास्त टॅक्स भरूनही राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये सुधारणा दिसत नाही. आर्थिक विकास नाही आणि पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही गुंतवणूक होताना दिसत नाहीये." त्यांच्यासोबत अनेक पीआयओ (PIO) मित्रही भारतात परतले आहेत. आपण देखील भारतात परतण्य़ाचा विचार करत आहे.''
या गंभीर स्थितीवर चिंता व्यक्त करत 'अरोरा ग्रुप'चे अध्यक्ष सुरिंदर अरोरा यांनी चान्सलर रेचल रीव्स यांना एक खुले पत्र लिहून उद्योजकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. जर सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत, तर देशातील उद्योजक आणि त्यांची ताकद दडपली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. वाढत्या करांमुळे आणि ढासळलेल्या सेवांमुळे आता संपन्न ब्रिटिश-भारतीय नागरिक ब्रिटनऐवजी UAE आणि भारत यांसारख्या इतर देशांमध्ये संधी शोधत आहेत.
यापूर्वी इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू रिओ फर्डिनांड आणि अब्जाधीश निक स्टोरोन्स्की (रेव्होलटचे सह-संस्थापक) हे दोघेही लंडन सोडून दुबईला गेले आहेत. फर्डिनांड यांनी वाढत्या करांना आणि बिघडलेल्या सार्वजनिक सेवांना जबाबदार धरले होते.