इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:40 IST2025-12-30T08:30:29+5:302025-12-30T08:40:08+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणचा मुद्दा उपस्थित केला. ट्रम्प यांनी उत्तर देताना म्हटले की, जर इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांबद्दलचे दावे खरे असतील तर यावेळी हल्ला आणखी तीव्र असेल.

इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिका दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते फ्लोरिडा येथे पोहोचले. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोघांनी अनेक तास चर्चा केली, या चर्चेचा मुख्य उद्देश गाझामध्ये युद्धबंदी योजना पुढे नेणे हा होता. चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहू यांचे कौतुक केले. ते युद्धकाळातील पंतप्रधान होते आणि त्यांनी उत्तम काम केले आहे, जर नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान नसते तर आज इस्रायल जगाच्या नकाशावर नसता, असंही ट्रम्प म्हणाले.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबतही कडक इशारा दिला. जर त्यांचे वर्तन सुधारले नाही तर त्याचे परिणाम भयानक होतील. इराणच्या क्षेपणास्त्र आणि अणुकार्यक्रमांबद्दल ट्रम्प म्हणाले की, या सर्व माहितीची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, जर ती खरी असेल तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील. हा हल्ला गेल्या वेळेपेक्षाही अधिक गंभीर असेल. इराणने गेल्या वेळी करार केला होता आणि आम्ही त्याला संधी दिली होती, परंतु नेहमीच असे होणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर इराणचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. चर्चेदरम्यान त्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेच्या लष्करी कारवाईची मागणी केली. दोन्ही नेत्यांची फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो अपार्टमेंटमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमधील ही पाचवी बैठक होती.
ट्रम्प नवीन वर्षात मोठी घोषणा करू शकतात
मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प जानेवारीमध्ये पॅलेस्टिनी तंत्रज्ञ सरकार आणि गाझामध्ये आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल तैनात करण्याबाबत मोठी घोषणा करू शकतात. ट्रम्प यांच्याशी भेट घेण्यापूर्वी नेतन्याहू यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचीही भेट घेतली.