'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:50 IST2025-10-29T11:50:04+5:302025-10-29T11:50:36+5:30
२८ वर्षीय भारतीय प्रणीत कुमार उसिरीपल्ली दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २,५०,००० डॉलर्सचा दंड होऊ शकतो.

'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
२८ वर्षीय भारतीय प्रणीत कुमार उसिरीपल्ली याने शिकागो-जर्मनी विमानात दोन किशोरवयीन मुलांवर हल्ला केला आणि एका महिला प्रवाशाला चापट मारली, ज्यामुळे विमानाचे बोस्टनमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्याला २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २,५०,००० डॉलर्सचा दंड होऊ शकतो.
२८ वर्षीय भारतीय नागरिक प्रणीत कुमार उसिरिपल्ली याला विमानात दोन किशोरवयीन प्रवाशांवर हल्ला केल्याबद्दल आणि एका महिला प्रवाशाला थप्पड मारल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी शिकागोहून जर्मनीला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानात ही घटना घडली. प्रणीतने दोन्ही मुलांवर काटा चमच्याने हल्ला केला, ज्यामुळे विमानाचे बोस्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
प्रणीतने प्रथम एका १७ वर्षीय मुलाच्या खांद्यावर काट्याने वार केला. त्यानंतर त्याने त्याच काट्याने दुसऱ्या मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला वार केला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर, उसिरिपल्लीवर अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात धोकादायक शस्त्राने हल्ला आणि शारीरिक दुखापत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
जेवण वाढताना झाला हल्ला!
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेवणाच्या वेळी हा हल्ला झाला. इतर प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने एका महिला प्रवाशाला चापट मारली आणि क्रू मेंबर्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रणीतला सध्या अमेरिकेत कायदेशीर इमिग्रेशन दर्जा नाही. तो पूर्वी स्टुडेंट व्हिसावर अमेरिकेत होता आणि बायबलच्या अभ्यासात पदव्युत्तर अभ्यासक्रम करत होता.
होऊ शकते १० वर्षांची शिक्षा!
२५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेल्या प्रणीतला नंतर बोस्टनमधील फेडरल कोर्टात हजर केले जाईल. दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २५०,००० डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो. प्रणीतची पार्श्वभूमी, मानसिक स्थिती तपासण्यासोबतच, हस्तक्षेप करणाऱ्या क्रू मेंबर्स आणि प्रवाशांचीही पोलीस चौकशी करतील.