Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:46 IST2026-01-14T10:46:09+5:302026-01-14T10:46:29+5:30
Thailand Train Accident: क्रेन कोसळल्यामुळे रेल्वेचे डबे एकमेकांवर आदळले आणि काही डब्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात घबराट पसरली होती.

Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
बँकॉक: थायलंडच्या नाखोन रत्चासिमा प्रांतात बुधवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना एक अवाढव्य क्रेन थेट चालत्या प्रवासी ट्रेनवर कोसळली. या भीषण धडकेमुळे रेल्वेचे डबे रुळावरून घसरले आणि त्यांना आग लागली. या अपघातात आतापर्यंत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन थायलंडची राजधानी बँकॉकहून उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. सकाळी ९:०५ च्या सुमारास सिखियो जिल्ह्यातील बान थानोन कोद जवळ ही घटना घडली. येथे चिनी बनावटीच्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होते. ट्रेन जात असताना अचानक पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन थेट रेल्वेच्या डब्यांवर कोसळली.
BREAKING: Dozens killed and injured after construction crane lifting section of bridge collapses on passenger train in Sikhio, Thailand. pic.twitter.com/SKyZIB7w1I
— AZ Intel (@AZ_Intel_) January 14, 2026
क्रेन कोसळल्यामुळे रेल्वेचे डबे एकमेकांवर आदळले आणि काही डब्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात घबराट पसरली होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकून पडले होते. बचाव पथकांनी हायड्रोलिक कटरचा वापर करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात?
ज्या क्रेनमुळे हा अपघात झाला ती क्रेन ५.४ अब्ज डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी वापरली जात होती. या भीषण अपघातानंतर थायलंडच्या परिवहन मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रेल्वे सुरक्षा आणि बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.