टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:04 IST2025-10-27T09:04:19+5:302025-10-27T09:04:33+5:30
अमेरिका-चीनचे तणाव निवळल्याचे संकेत

टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
कौलालंपूर : अमेरिकेच्या आर्थिक दबावापुढे नमून रविवारी थायलंड आणि कंबोडियाने युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. असा शांतता करार होऊ शकत नाही असे लोक बोलत होते, पण आम्ही ते करून दाखवले, अशी ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. कंबोडियाच्या पंतप्रधानांनी ही युद्धबंदी ऐतिहासिक असल्याचे म्हटले, तर थायलंडच्या पंतप्रधानांनी या करारामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे सांगितले. यानंतर लगेच कैद्यांची सुटका केली जाणार आहे.
अमेरिका-चीनचे तणाव निवळल्याचे संकेत
क्वालालंपूर : आसियान परिषदेच्या निमित्ताने अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफवरूनचा तणाव कमी आल्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी चीनने जगातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत सहमती झाल्याचे संकेत दिले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक सकारात्मक वातावरणात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी चीनने उभय देशांमधील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्राथमिक पातळीवर सहमती दिसून आलेली आहे.
कौलालंपूर विमानतळावर ट्रम्प यांनी धरला ठेका
ट्रम्प आसियानच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी कौलालंपूर येथे आले असून विमानतळावर त्यांनी स्थानिक कलाकारांसोबत नृत्य केले. आपल्या विशिष्ट ठेक्यात नाचत असताना ट्रम्प यांच्या एका हातात अमेरिकेचा, तर दुसऱ्या हातात मलेशियाचा झेंडा होता.
ट्रम्प यांनी नंतर कम्बोडिया, थायलंड, मलेशियासोबत आर्थिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. चीनवरील अमेरिकेचे अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने महत्त्वाच्या खनिजांसाठी या देशांशी करार केले आहेत. त्यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचीही भेट घेतली.