ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 05:02 IST2025-12-15T05:02:29+5:302025-12-15T05:02:54+5:30
एका हल्लेखोराला पोलिसांनी ठार मारले; ज्यूंना लक्ष्य करणारा हा दहशतवादी हल्ला; इस्रायलकडून निषेध

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार
सिडनी: येथील लोकप्रिय बाँडी बीचवर ज्यू धर्मियांच्या सणानिमित्त जमलेल्या नागरिकांवर दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात १२ जण ठार झाले. पोलिसांनी दोन दहशतवाद्यांपैकी एका हल्लेखोराला ठार मारले, तर दुसऱ्याला अटक करण्यात आली आहे. तो अत्यवस्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात २९ जण जखमी झाले त्यात दोन पोलिस आहेत. घटनास्थळी पोलिसांना अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्याचे नावीद अक्रम असे आहे.
हल्लेखोरांनी काळे कपडे घातले होते आणि त्यांच्याकडे सेमी ऑटोमेंटिक रायफल होती. या दोघांनी बीचवर जमलेल्या शेकडो पर्यटकांच्या दिशेने बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे बीचवरील पर्यटक सैरावैरा पळू लागले. या दरम्यान उपस्थित पोलिसांनी हल्लेखोरांवर केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला, तर दुसऱ्याला अहमद अल अहमद या फळविक्रेत्याने विरोध केला. या दहशतवाद्याला जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आले.
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ज्यू लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असे रविवारी रात्री जाहीर केले. हा दहशतवादी हल्ला असून तो केवळ ज्यूंना लक्ष्य करण्यासाठी होता, असे सिडनी राज्याच्या प्रमुखांनी सांगितले.
ज्यू सणानिमित्त जमले होते पर्यटक
१. रविवारी सिडनीच्या बाँडी बीचवर हनुखा या ज्यू धर्मीयांच्या सणाच्या निमित्ताने 'चानुका बाय द सी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला ज्यू पर्यटक आले होते. हा सण दिव्यांचा असतो तो ८ दिवस सुरू असतो.
२. जगभरातून अनेक ज्यू धर्मीय हा हा सण साजरा करत असतात. सुटी असल्याने सकाळपासून या बीचवर शेकडो पर्यटक जमू लागले होते. बाँडी बीच हा सिडनीतील सर्वांत लोकप्रिय बीच आहे.
मोदींकडून निषेध
सिडनी हल्ल्याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत संपूर्ण भारत अशा कठीण परिस्थितीत ऑस्ट्रेलियातील नागरिकांसोबत असल्याचे 'एक्स'वर द्विट केले आहे.
थरकाप उडवणारी दृश्ये
बाँडी बीचवरील हल्ल्याचे थरकाप उडवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडीओत काळा टी शर्ट घातलेल्या हल्लेखोराला एका व्यक्तीने पकडल्याचे दिसते. पण हल्लेखोर जखमी अवस्थेत पळाला आणि छोट्या पुलावरून पर्यटकांवर गोळ्या झाडणाऱ्या दुसऱ्या हल्लेखोराजवळ गेला.
'ज्यूंवरचा हा निघृण हल्ला'
इस्रायलचे पंतप्रधान इस्साक हर्जोग यांनी हा ज्यूंवरचा निघृण हल्ला असून ज्यूच्याविरोधात अशा कारवाया करण्यांवर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली.