दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:02 IST2025-11-12T16:00:35+5:302025-11-12T16:02:11+5:30
पाकिस्तानी हँडलरचे भारतभर “डॉक्टर मॉड्यूल” उभारण्याचे निर्देश...

दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
राजधानी दिल्लीतील कार ब्लास्ट कनेक्शन आता पाकिस्तानच नव्हे, तर आणखी एका मुस्लीम देशाशी जुळताना दिसत आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटातील प्रमुख संशयित डॉक्टर मोहम्मद उमर आणि डॉक्टर मुजम्मिल शकील यांच्या पासपोर्टवर थेट तुर्की प्रवासाची नोंद आढळून आली आहे. मात्र पोलीस अथवा तपास यंत्रणांकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सोमवारी सायंकाळी ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला, ती कार उमर चालवत होता. त्याचे कनेक्शन फरीदाबादमध्ये उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडले जात आहेत.
पाकिस्तानी हँडलरचे भारतभर “डॉक्टर मॉड्यूल” उभारण्याचे निर्देश -
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आता तपास यंत्रणा दिल्ली स्फोटाच्या तुर्की कनेक्शनचा शोध घेत आहेत. उमर आणि मुजम्मिल काही टेलिग्राम समूहात सहभागी झाल्यानंतरच तुर्कीला गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. एका पाकिस्तानी हँडलरने भारतभर “डॉक्टर मॉड्यूल” उभारण्याचे निर्देश दिल्याचेही उघड झाले आहे. त्यात फरीदाबाद आणि सहारनपूर या ठिकाणांचा विशेष उल्लेख होता. तपासादरम्यान असे दोन टेलिग्राम समूह समोर आले आहेत, यांपैकी एक गट पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’चा ऑपरेटिव्ह उमर बिन खत्तब चालवत असल्याचा संशय आहे.
लाल किल्ल्याची रेकी केली होती
पीटीआयच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या प्रमुख संशयितांपैकी एक डॉ. मुजम्मिल गनईने जानेवारी महिन्यात लाल किल्ला परिसराची रेकी केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 26 जानेवारीच्या सुमारास मोठा हल्ला घडविण्याच्या कटाचा हा भाग असू शकतो. मोबाइल टॉवर लोकेशन आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्याच्या हालचालींची खात्री करण्यात आली आहे.
आता तपास यंत्रणा, मॉड्यूलच्या कारवायांसाठी निधी आणि स्फोटकांच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी डॉ. मुजम्मिल यांच्या कम्युनिकेशन्स आणि डिजिटल फूटप्रिंटचे विश्लेषण करत आहेत.