इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ल्याचा थरार; ५० जणांचा मृत्यू, राजधानीत आणीबाणी अन् शेअर बाजारात हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 22:41 IST2026-02-06T22:40:10+5:302026-02-06T22:41:22+5:30
नमाजाच्या वेळी एका शिया इमामवाड्याला लक्ष्य करण्यात आले असून, या स्फोटात आतापर्यंत ५० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ल्याचा थरार; ५० जणांचा मृत्यू, राजधानीत आणीबाणी अन् शेअर बाजारात हाहाकार
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज भीषण आत्मघाती हल्ल्याने हादरली आहे. नमाजाच्या वेळी एका शिया इमामवाड्याला लक्ष्य करण्यात आले असून, या स्फोटात आतापर्यंत ५० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या रक्तपातामुळे संपूर्ण पाकिस्तानात दहशतीचे वातावरण असून, इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले असून, जवान सध्या रस्त्यावर तैनात आहेत.
रक्तपाताचे पडसाद शेअर बाजारात
दहशतवादी हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचीही दाणादाण उडाली. 'पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज'मध्ये गुंतवणूकदारांनी भीतीपोटी शेअर्सची विक्री सुरू केली. यामुळे कराची शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ४,२०० अंकांनी कोसळला आणि १,८३,६०० च्या पातळीवर आला. एका बाजूला मृतदेहांचा खच पडलेला असताना दुसरीकडे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये मातीमोल झाले.
लष्कराचा सर्च ऑपरेशन आणि हाय अलर्ट
हल्ल्यानंतर केवळ इस्लामाबादच नाही, तर संपूर्ण पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. बलुचिस्तानमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून 'जाफर एक्सप्रेस' रेल्वे थांबवण्यात आली आहे. संभाव्य दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांनी कॉम्बिग ऑपरेशन सुरू केले असून, शहराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी या हल्ल्याचा निषेध करताना, "हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दहशतवादाचे नंबर २चे केंद्र बनला पाकिस्तान
'ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२५'च्या ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तान आता जगातील दुसरा सर्वात मोठा दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुच लिबरेशन आर्मी यांसारख्या संघटनांनी देशात हिंसाचाराचे रान पेटवले आहे. टीटीपीच्या हल्ल्यात ९० टक्क्यांनी वाढ झाली असून, पाकिस्तान सध्या स्वतःच्याच कर्माची फळे भोगत असल्याची चर्चा जागतिक स्तरावर रंगली आहे.
बाजार का कोसळला?
दोन दिवसांच्या सुट्टीपूर्वी झालेल्या या हल्ल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भविष्यात अधिक अस्थिरता निर्माण होईल, या भीतीने गुंतवणूकदारांनी घाईघाईत विक्री केली. राजधानीच सुरक्षित नसेल तर गुंतवणूक कशी टिकणार, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.