धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 20:03 IST2026-04-07T20:00:02+5:302026-04-07T20:03:10+5:30
Donald Trump final warning To Iran: आजची रात्र इराणची अखेरची रात्र असेल, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच इराणमध्ये हल्ले झाले. त्यात तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त करण्यात आले.

धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
Iran-Israel war ignites, Major US attack: अमेरिकेने दिलेली मुदत ७ एप्रिलच्या रात्री संपत असून त्यापूर्वीच अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर मोठे हल्ले केले. इराणमधील तीन पूल उद्ध्वस्त करण्यात आले असून, इराणने मशहद या शहरातील सर्व प्रकारच्या रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. अमेरिका-इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यांनंतर खवळलेल्या इराणने पलटवार करण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत संयम दाखवला आणि विचारपूर्वक हल्ले करण्या आले. पण आता कोणत्याही गोष्टीचा विचार केला जाणार नाही, असे इराणने म्हटले आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपत असतानाच इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरील हल्ले वाढवले आहेत. हवाई हल्ल्यांमध्ये तीन पूल उद्ध्वस्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इराणने रेल्वे सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
ट्रम्प यांनी आधीच इराणमधील उड्डाण पूल उडवून देऊ अशी धमकी दिली होती. तशी कारवाई अमेरिकेने सुरू केल्याचे दिसत आहे. तबरेज जांजन महामार्गावरील पूल उद्ध्वस्त करण्यात आला आहे. हा महामार्ग इराणच्या पश्चिम भागात आहे.
इराणची सरकारी वृत्तवाहिनी आयआरएनएने अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, काशानमध्येही एका रेल्वे पुलावर हवाई हल्ला झाला आहे. त्यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्फाहान प्रांतातचे संरक्षण उप गव्हर्नरने सांगितले की, काही वेळापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने काशान काऊंटीमधील याह्याबाद रेल्वे पुलावर हवाई हल्ला केला. यात दोन लोक मरण पावले, तर तीन जखमी झाले आहेत.
मशहद शहरातील रेल्वे बंद
इस्रायल आणि अमेरिकेकडून रेल्वे मार्गांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. इस्रायलने तसा इशारा इराणमधील नागरिकांनाही दिला आहे. रेल्वेतून प्रवास करू नये असे इस्रायलने म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर इराणने महत्वाच्या मशहद शहरातील रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मशहदचे गव्हर्नर म्हणाले की, देशातील रेल्वेवर इस्रायलकडून देण्यात आलेल्या हल्ल्याची धमकी विचारात घेऊन रेल्वे सेवा पुढील निर्णयापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना प्रवास करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी रस्ते मार्गावरून आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.
इराणच्या अनेक शहरात स्फोटाचे आवाज
इराणमधील तेहरानसह कोम, लोरेस्तान प्रांतांमधील खोर्रमबाद विमानतळासह इतर काही ठिकाणी हवाई हल्ले झाले. कोम शहराला जोडणाऱ्या एका पुलावर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला. अमेरिकेने खार्ग बेटावरही पुन्हा हल्ला केला असून, तिथूनही आगीचे लोळ आणि धुराचे लोट पडताना दिसले.