अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 21:51 IST2026-01-07T21:50:47+5:302026-01-07T21:51:16+5:30
याशिवाय कॅरिबियन सागरातही अमेरिकन तटरक्षक दलाने व्हेनेझुएलाहून येणारा एक तेल टँकर रोखला आहे.

अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अटलांटिक महासागरात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर अमेरिकेने रशियन झेंडे असणारे तेल टँकर मरीनेरा हे जहाज जप्त केले आहे. या सैन्य कारवाईनंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे कारण या ऑपरेशनवेळी रशियन नौदलाची युद्धनौका आणि पाणबुडीही याच भागात होती.
याशिवाय कॅरिबियन सागरातही अमेरिकन तटरक्षक दलाने व्हेनेझुएलाहून येणारा एक तेल टँकर रोखला आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी दोन्ही ठिकाणी यशस्वी मोहिमेची पुष्टी केली आणि 'घोस्ट फ्लीट' (बेकायदेशीर व्यापारात सहभागी जहाजे) विरुद्ध ही एक मोठी कारवाई असल्याचे म्हटलं. अमेरिकन तटरक्षक दलाने सकाळी लवकर दोन अत्यंत अचूक आणि समन्वित ऑपरेशन्स केली. पहिला टँकर, मोटर टँकर बेला-I, उत्तर अटलांटिकमध्ये जप्त करण्यात आला, तर दुसरा मोटर टँकर सोफिया कॅरिबियनमधील आंतरराष्ट्रीय पाण्यात जप्त करण्यात आला. दोन्ही जहाजे अलीकडेच व्हेनेझुएलामध्ये बंदिस्त झाली होती किंवा तस्करी केलेले तेल घेऊन तिथे जात होती असं क्रिस्टी यांनी सांगितले.
बुधवारी अमेरिकन युरोपियन कमांडने याची पुष्टी केली. व्हेनेझुएलाच्या तेल व्यापाराशी निगडीत रशियन टँकर "मरीनेरा" अमेरिकन सैन्य आणि तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला आहे. कथित निर्बंध उल्लंघनासाठी फेडरल कोर्टाच्या वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असं त्यांनी सांगितले. या कारवाईत पाणबुड्या आणि युद्धनौकांचा समावेश होता. अटलांटिक महासागरात जप्तीची ही घटना घडली तेव्हा रशियन नौदलाची पाणबुडी आणि अनेक युद्धनौका आइसलँडजवळील पाण्यात तैनात होत्या.
The @TheJusticeDept & @DHSgov, in coordination with the @DeptofWar today announced the seizure of
— U.S. European Command (@US_EUCOM) January 7, 2026
the M/V Bella 1 for violations of U.S. sanctions. The vessel was seized in the North Atlantic pursuant to a warrant issued by a U.S. federal court after being tracked by USCGC Munro. pic.twitter.com/bm5KcCK30X
रशियन टँकरला एका रात्रीत पकडण्यात यश आले नाही, अटलांटिक महासागरात त्यांना गेले आठवडाभर ट्रॅक केले जात होते. या टँकरने यापूर्वी अमेरिकेच्या सागरी 'नाकेबंदी'ला चकमा दिला होता. जहाजावर चढण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी अमेरिकन तटरक्षक दलाच्या वारंवार सूचना आणि विनवणी नाकारल्या होत्या. शिवाय, ताब्यात घेण्याच्या भीतीने या जहाजाने समुद्राच्या मध्यभागी आपली ओळख लपविण्यासाठी आपला ध्वज आणि नोंदणी देखील बदलली होती असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय गुप्तचर अहवालांमध्ये टँकरच्या मार्गावर रशियन नौदलाच्या हालचाली वाढल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण वेढा आणखी तणावपूर्ण झाला. ऑपरेशन दरम्यान रशियन युद्धनौका आणि एक पाणबुडी या भागात उपस्थित असल्याची पुष्टी अमेरिकन अधिकाऱ्यांनी केली. रशियन लष्करी जहाजे आणि टँकरमधील अचूक अंतर स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या हजेरीमुळे ऑपरेशन आणखी गंभीर भू-राजकीय संघर्षात रूपांतरित झाले. या आव्हानात्मक ऑपरेशनमध्ये ब्रिटनचे सहकार्य खूप निर्णायक होते. त्यासाठी ब्रिटनच्या लॉन्चपॅडचा वापर करण्यात आला.