चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 21:10 IST2025-11-18T21:09:36+5:302025-11-18T21:10:07+5:30
चीन आणि जपान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे दूत आणि आशियाई व ओशियनियन प्रकरणांचे महासंचालक मसाकी कनाई यांनी आपली चीनची अधिकृत भेट पूर्ण करून बिजिंग सोडले आहे.

चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
पूर्व आशियात चीन आणि जपान यांच्यातील तणाव अभूतपूर्व वाढला आहे. जपानच्या नव्या नेतृत्वाने तैवानच्या रक्षणासाठी सैन्य पाठवण्याची तयारी दाखवल्याने चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता सध्या आर्थिक अवलंबित्व आणि जागतिक दबावामुळे कमी आहे. परंतू, चीननेही जपानला थेट युद्धाची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
चीन आणि जपान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे दूत आणि आशियाई व ओशियनियन प्रकरणांचे महासंचालक मसाकी कनाई यांनी आपली चीनची अधिकृत भेट पूर्ण करून बिजिंग सोडले आहे. त्यांच्या या मौन प्रस्थानामुळे दोन्ही देशांमधील संबंधांच्या भवितव्याबद्दल जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. जापानच्या पंतप्रधानांनी तैवानच्या संरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करणे आणि द्विपक्षीय संबंध स्थिर करणे, हे मसाकी कनाई यांच्या बीजिंग भेटीचे मुख्य उद्दिष्ट होते. परंतू, मसाकी यांच्या वागण्यामुळे ते विफल ठरल्याचे दिसत आहे.
चर्चा संपल्यानंतर मसाकी कनाई आणि त्यांचे शिष्टमंडळ बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परत निघाले. यावेळी विमानतळावर उपस्थित असलेल्या पत्रकारांनी कनाई यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि ते थेट विमानाकडे निघाले. दूत गप्प राहिल्यामुळे 'युद्ध होणार की नाही?' या प्रश्नावरील अनिश्चितता कायम आहे.
चीन (दुसरी) आणि जपान (चौथी) या जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये संघर्ष झाल्यास जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल. सेमीकंडक्टर (चिप्स) पुरवठा खंडित होईल, ज्यामुळे मोबाइल, कार आणि संगणक महाग होतील. यामुळे भारत आणि इतर देशांना महागाई व मंदीचा सामना करावा लागेल.