तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:39 IST2026-01-03T11:09:05+5:302026-01-03T11:39:31+5:30
जिया यांच्या निधनामुळे पक्षाचे अध्यक्षपद रिक्त झाले असून, आता त्यांचे पुत्र तारिक रहमान हे पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. मात्र..

तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या सर्वेसर्वा खालिदा जिया यांच्या निधनानंतर देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जिया यांच्या निधनामुळे पक्षाचे अध्यक्षपद रिक्त झाले असून, आता त्यांचे पुत्र तारिक रहमान हे पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. मात्र, आगामी १३ व्या संसदीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BNP उमेदवारांसमोर एक विचित्र आणि तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. हा पेच आहे निवडणूक प्रचाराच्या बॅनरवर कुणाचा फोटो लावायचा?
काय आहे नेमकी अडचण?
बांगलादेशातील निवडणूक आचारसंहितेच्या 'नियम ७ (f)' नुसार, जर एखादा उमेदवार राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवत असेल, तर त्याला आपल्या प्रचाराच्या बॅनर, पोस्टर किंवा पत्रकांवर केवळ त्याच्या विद्यमान पक्षप्रमुखाचाच फोटो लावता येतो. खालिदा जिया यांच्या निधनानंतर त्या आता तांत्रिकदृष्ट्या विद्यमान प्रमुख राहिलेल्या नाहीत. दुसरीकडे, तारिक रहमान यांनी जबाबदारी स्वीकारली असली तरी पक्षाने अद्याप अधिकृतपणे त्यांची अध्यक्ष म्हणून घोषणा केलेली नाही.
उमेदवारांचे लाखो रुपये पाण्यात जाणार?
येत्या १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच अनेक उमेदवारांनी लाखो रुपये खर्च करून हजारो पोस्टर्स, डिजिटल बॅनर आणि पत्रके छापून घेतली होती. या सर्व साहित्यावर खालिदा जिया यांचे फोटो आहेत. आता जियांच्या निधनामुळे ही सर्व प्रचारसामग्री बदलण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. जर नियमांचे पालन केले नाही, तर उमेदवारी धोक्यात येऊ शकते, अशी भीती उमेदवारांना वाटत आहे.
तारिक रहमान नवे 'बॉस', पण घोषणा बाकी
खालिदा जिया यांनी ३० डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पक्षाच्या घटनेनुसार, कार्यकारी अध्यक्ष असलेले तारिक रहमान आता आपोआपच अध्यक्ष झाले आहेत. मात्र, सध्या बांगलादेशात सात दिवसांचा शोक पाळला जात असल्याने ५ जानेवारीपर्यंत कोणतीही अधिकृत राजकीय घोषणा केली जाणार नाही. तोपर्यंत प्रचाराचे काय करायचे, यावरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
निवडणूक आयोगाकडे धाव घेणार
बीएनपीच्या स्थायी समितीचे सदस्य सलाहुद्दीन अहमद यांनी सांगितले की, "प्रचाराच्या पोस्टरवर पक्षप्रमुखाचा फोटो असणे अनिवार्य आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाशी संपर्क साधणार आहोत." एकीकडे आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे निवडणुकीचा तांत्रिक पेच, अशा दुहेरी संकटात सध्या 'बीएनपी'चे उमेदवार अडकले आहेत. तारिक रहमान यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.