बॉम्ब टाकतो, टॅरिफ लावतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:04 IST2026-01-11T12:04:39+5:302026-01-11T12:04:39+5:30
ताकदीच्या जोरावर जगातील छोट्या-मोठ्या देशांना झुकवण्याचा चंग बांधलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट स्वार्थासाठी देशांवर हल्ले करणे सुरू केले आहे. व्हेनेझुएला हे त्याचे पहिले उदाहरण... पुढे आणखी चार-पाच देश आहेत...

बॉम्ब टाकतो, टॅरिफ लावतो...
डॉ. सुखदेव उंदरे
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
अमेरिकेच्या विशेष दलांनी ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये लष्करी कारवाई केली. मादुरो आणि त्यांची पत्नी, सिलिया फ्लोरेस यांना पकडण्यात आले. या जोडप्याला अंमली पदार्थ-दहशतवाद आणि अवैध अंमली पदार्थाची तस्करी यांसारख्या संघीय आरोपांचा सामना करण्यासाठी न्यूयॉर्कला नेण्यात आले. अमेरिकेची ही कृती म्हणजे अमेरिकन नव-साम्राज्यवादाचा चेहरा पुढे आणणारी आहे.
यावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काही देशांनी आणि बहुपक्षीय संघटनांनी संवाद आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेवर भर दिला आहे. अमेरिकेतील समर्थक या कारवाईला हुकूमशाही आणि गुन्हेगारी शासनाविरुद्ध एक आवश्यक प्रहार मानतात, तर समीक्षक याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हणून निषेध करत आहेत.
भारताची भूमिका
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घडणाऱ्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे आणि दोन्ही पक्षांना व्हेनेझुएलाच्या लोकांचे कल्याण व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आणि वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करणे आणि सक्तीने हद्दपार करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या अनुच्छेद २ चेही उल्लंघन करते.
निकोलस माद्रो काय म्हणतात?
ट्रम्प प्रशासन दीर्घ काळापासून आपल्याला सत्तेवरून हटवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मादुरो यांनी अनेकदा केला आहे. व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यांवर अमेरिकेला नियंत्रण हवे आहे, हे त्यामागचे कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नव-साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष्य
मादुरो यांच्यावरील लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोलंबिया, ग्रीनलैंड, मेक्सिको, क्युबा आणि इराणसह इतर राष्ट्रे आणि प्रदेशांवर अमेरिकन नव-साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष्य साधण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे.
सार्वभौमत्वाचे अस्तित्व
व्हेनेझुएलावरील आक्रमण हा ट्रम्पवादाच्या एकाकी-साम्राज्यवादी संकराचा नैसर्गिक, हिंसक परिणाम आहे. जर आंतरराष्ट्रीय समुदाय शांत राहिला, तर तो अशा जागतिक व्यवस्थेला मान्यता देईल, जिथे सार्वभौमत्व हे अमेरिकेच्या मर्जीवर अवलंबून असेल.
आज व्हेनेझुएला एका 3 महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. हा क्षण अधिक स्थिर, समृद्ध युगाची सुरुवात करेल की दीर्घकाळापासूनच्या दरी अधिक रुंद करेल, हे अद्याप अस्पष्ट आहे. याचे कारण म्हणजे निकोलस मादुरो यांचे अमेरिकेच्या हाती असणारे राजकीय भवितव्य. आणि याच कारणामुळे व्हेनेझुएला सध्या एका अनिश्चिततेच्या संक्रमण काळात ढकलला गेला आहे
१८% तेलसाठा (जगातील एकूण तेलसाठ्यापैकी) एकट्या व्हेनेझुएलामध्ये आहे. त्यावर ट्रम्प यांचा डोळा आहे, हे जगजाहीर आहे.
१०० किलोमीटर लांबीचा रस्ता पनामा आणि कोलंबियामधील पर्वत आणि पर्जन्यवनांतून जातो. तो 'डॅरियन गॅप' म्हणून ओळखला जातो. मध्य व दक्षिण अमेरिकेला जोडणारा हा एकमेव भूमार्ग. स्थलांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गापैकी हा जगातील सर्वात धोकादायक मार्ग समजला जातो.
तेल साठा व खनिज संपत्ती
व्हेनेझुएलामध्ये ३०० अब्ज बॅरलपेक्षा जास्त तेलाचे साठे आहेत. हे साठे जगातील कोणत्याही देशाच्या तेल साठ्यांपेक्षा जास्त आहे. या साठ्यांतील सर्वाधिक तेल हे खूप जड (घनता) असे कच्चे तेल आहे. हे तेल काढण्याची प्रक्रिया अतिशय महागडी आहे. तरीही व्हेनेझुएला जगात पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. सध्या, व्हेनेझुएला दररोज सुमारे ९ लाख बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करतो आणि चीन त्याचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे.