जगात मान्यता मिळवण्यासाठी तालिबान धडपडतोय, पण परिवर्तन झालंय असं मानत नाही : जो बायडेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 20:13 IST2021-08-19T20:11:59+5:302021-08-19T20:13:22+5:30
Afghanistan Taliban Crisis : रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर ताबा मिळवत देशाची सूत्रं घेतली होती हाती. तालिबाननं आपल्याला मान्यता देण्यात यावी असंही केलं होतं वक्तव्य.

जगात मान्यता मिळवण्यासाठी तालिबान धडपडतोय, पण परिवर्तन झालंय असं मानत नाही : जो बायडेन
तालिबाननं रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवत देशाची सूत्रं आपल्या हाती घेतली. याच दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देशातून पलायन केलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तालिबाननं आंतरराष्ट्रीय समुदायानं आपल्याला मान्यता द्यावी असं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. "तालिबान संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठी धडपड करत आहे. परंतु तालिबान बदललाय असं मी मानत नाही," असं बायडेन म्हणाले.
"तालिबान आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात त्याला मान्यता हवी आहे. परंतु तालिबान बदललाय असं मला वाटत नाही," असं महत्त्वपूर्ण वक्तव्य जो बायडेन यांनी केलं. एबीसी न्यूजच्या डॉर्ज स्टेफॅनोपॉल्स यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "तालिबान अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर जाऊ देईल का नाही याची भविष्यवाणी करता येणार नाही. परंतु भरवसा करता येईल असा तालिबान नाही. याकडे पाहता जोपर्यंत अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिक तोवर असतील जोवर त्या ठिकाणाहून अमेरिकन नागरिक सुरक्षित बाहेर पडणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तारीख पुढे गेली तरी चालेल
"अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत सैन्य देशाच्या बाहेर जाईल ही निश्चित केलेली तारीख पुढे गेली तरी चालेल," असंही ते म्हणाले. सध्या जो बायडेन अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचा बचाव करताना दिसून येत आहेत.
इतक्या लवकर काही होईल अंदाज नव्हता
"अमेरिकेच्या इंटेलिजन्सला या गोष्टीचा अंदाज नव्हता की हे सर्वकाही इतक्या लवकर होईल. अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानच्या बाहेर गेल्यानंतर तालिबान पुन्हा तेजीनं डोकं वर काढू शकतो असा त्यांचा अंदाज होता," असंही बायडेन यांनी सांगितलं. दरम्यान, यानंतर अमेरिकेला आता आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक विशेष मोहीम चालववी लागत आहेत. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमधील परिस्थिती ज्याप्रकारे एकदम बदलली त्यावरून अमेरिकन नागरिकही हैराण आहेत.
अफगाणिस्तानप्रकरणी जो बायडेन यांनी अनेक स्तरांवर टीका सहन करावी लागत आहे. आपण जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशीदेखील चर्चा करणार असल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.