Afghanistan: तालिबानने 65 टक्के अफगाणिस्तान ताब्यात घेतला; अर्थमंत्र्यांचे दुसऱ्या देशात पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:09 IST2021-08-11T19:08:43+5:302021-08-11T19:09:01+5:30
Afghanistan Taliban War: मुख्य सीमा शुल्क चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्याने सरकारच्या महसुलात मोठी घट झाली आहे. बिघ़डच चाललेली परिस्थीती आणि पत्नी आजारी असल्याने पायंडा यांनी देश सोडला आहे.

Afghanistan: तालिबानने 65 टक्के अफगाणिस्तान ताब्यात घेतला; अर्थमंत्र्यांचे दुसऱ्या देशात पलायन
तालिबानने (Taliban) जवळपास 65 टक्के अफगानिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला आहे. यामुळे लष्करप्रमुखांना हटविण्यात आलेले असताना आता अर्थमंत्र्यांनी भीतीने देश सोडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता सरकारमध्ये देखील तालिबानची दहशत निर्माण होत चालली आहे. (Taliban captured 65 percent of Afghanistan.)
ISISच्या मार्गावर तालिबान! सेक्स गुलाम बनविण्यासाठी घराघरात घुसून मुलींना पळवू लागले, महिलांवर संकट
अफगानिस्तानचे कार्यवाहू अर्थ मंत्री खालिद पायंडा यांनी राजीनामा दिला आहे. ब्लूमबर्ग मीडिया नेटवर्कनुसार पायंडा यांनी राजीनामा दिला असून देशाच्या मुख्य सीमा शुल्क चौक्यांवर तालिबानने कब्जा केल्याने त्यांनी देश सोडला आहे. दुसरीकडे पायंडा यांनीदेखील ट्विट करून राजीनाम्याची माहिती दिली आहे.
मुख्य सीमा शुल्क चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्याने सरकारच्या महसुलात मोठी घट झाली आहे. बिघ़डच चाललेली परिस्थीती आणि पत्नी आजारी असल्याने पायंडा यांनी देश सोडला आहे. पायंडा कुठे गेले हे अद्याप समजलेले नाही. त्यांनीदेखील काही कारण सांगितलेले नाही. तालिबानने शक्रवारपासून अफगानिस्तानच्या नऊ प्रांतिय राजधान्यांवर कब्जा केला आहे. यामध्ये फैजाबाद, फराह, पुल-ए-खुमरी, सर-ए-पुल, शेबरगान, ऐबक, कुंदुज, तालुकान आणि जरंज ही शहरे आहेत.
उत्तरेकडील प्रांतांमध्ये आव्हानात्मक सुरक्षा स्थिती असून राष्ट्रपती गनी यांनी बुधवारी बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ शहराचा दौरा केला. मंगळवारी रात्री माजी उपराष्ट्रपती मार्शल अब्दुल राशिद दोस्तम यांनीदेखील मजार-ए-शरीफला भेट दिली. या दोघांची लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये तालिबानच्या ताब्यात गेलेल्या शहरांना सोडविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
बंदुकीच्या धाकावर सत्तेत येणाऱ्या कोणत्याही सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली जाणार नाही, असे अमेरिकेचे शांती दूत जालमय खलीलजाद यांनी सांगितले. लोक घरे सोडून काबुलकडे पलायन करत आहेत. तेथील पार्क आणि गल्ल्यांमध्ये या लोकांनी युद्धाच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी आश्रय घेतला आहे.