तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 22:13 IST2025-12-19T22:10:53+5:302025-12-19T22:13:31+5:30
Taiwan Metro Attack: हल्लेखोराने आधी ग्रेनेड फेकले, नंतर चाकूहल्ला करण्यास सुरुवात केली

तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
Taiwan Metro Attack: तैवानची राजधानी तैपेईमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका माथेफिरूने मेट्रो स्टेशनवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात एका संशयितासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून किमान ९ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चँग वेन (वय २७) नावाच्या एका तरुणाने तैपेई मेन स्टेशनवर गॅस मास्क घालून प्रवेश केला. त्याने स्टेशनच्या परिसरात ५ ते ६ ग्रेनेड्स (Smoke Grenades) फेकले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर त्याने चाकूने लोकांवर अंदाधुंद हल्ले करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने त्याने लोकांच्या मानेवर वार केले, त्यात तिघांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच असल्याचे सांगण्यात आले.
हल्ल्याच्या भीतीने तिघांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
हल्ल्यात निरपराध नागरिक ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा कार्डिॲक अरेस्टमुळे (हृदयविकाराचा झटका) मृत्यू झाला. तसेच हल्लेखोराचा उडी मारल्याने मृत्यू झाला. तैवानच्या महापौरांनी सांगितले की, हल्ल्याच्या धक्क्याने आणि भीतीपोटी ३ जणांना कार्डिॲक अरेस्ट झाला होता. या घटनेनंतर तैवानमधील सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हल्लेखोराचा अंत
हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पोलिसांपासून वाचण्यासाठी जवळच्या एका शॉपिंग मॉलच्या इमारतीवर चढला. पोलिसांच्या पाठलागादरम्यान त्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी हा लष्करी प्रशिक्षणातून पळालेला (Draft Evader) असल्याची माहिती समोर येत आहे.