Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:20 IST2025-12-14T17:17:54+5:302025-12-14T17:20:14+5:30
Police respond to shooting at Sydney's Bondi Beach: सिडनीमधील बोंडी बीचवर समुदायावर अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. गोळीबार करत असताना एक व्यक्ती समोर मृत्यू असतानाही जातो आणि गोळीबार करणाऱ्याला पकडतो.

Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात प्रसिद्ध असलेल्या बोंडी समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अनेक ज्यू समुदायातील लोक हनुक्का सणानिमित्त पहिल्या रात्री उत्सव साजरा करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एका व्यक्तीने धाडस दाखवत गोळीबार करणाऱ्याला पकडले.
हनुक्का उत्सव या वर्षी १४ डिसेंबरपासून सुरू झाला असून, २२ डिसेंबर रोजीपर्यंत चालणार आहे. या उत्सवानिमित्त हजारो ज्यू लोक समुद्र किनारी जमा झाले होते. या गोळीबारात कमीत कमी दहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक लोक गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
मृत्यूचे तांडव सुरू असताना तो समोर आला
गोळीबार सुरू असताना आणि पोलीस पोहचण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात आरोपी गोळीबार करताना दिसत आहे. सगळीकडे धावपळ सुरू झाली. लोक जीव मुठीत घेऊन पळत होते. अशातच एक व्यक्ती गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने धावत जाताना दिसत आहे.
पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती कारच्या आडोशाने हळहळू गोळीबार करणाऱ्या व्यक्तीपर्यंत जातो आणि त्याला काही कळायच्या आत पाठीमागून पकडतो. दोघांमध्ये झटापट सुरू होते. पण, व्यक्ती त्याच्या हातातील रायफल हिसकावतो.
WATCH: Bystander disarms active shooter at Bondi Beach in Sydney pic.twitter.com/g7lrayGWYr
— BNO News (@BNONews) December 14, 2025
रायफल घेतल्यानंतर तो व्यक्ती गोळीबार करणाऱ्यावर ती ताणतो, त्यामुळे आरोपी घाबरतो आणि पाठीमागे जातो. एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे अशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम आहे. थोडी जरी चूक आरोपीकडे धावताना किंवा पकडताना झाली असती, तर त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असता.
दोन हजार लोक कार्यक्रमाला आले होते
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ज्यू समुदायातील तब्बल दोन हजार लोक आपल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. चाबाद या ज्यू संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६.४५ वाजता अचानक दोन शस्त्रास्त्र लोक आले. त्यांनी काळे कपडे परिधान केलेले होते. त्यांनी अचानक लोकांवर गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून धावपळ सुरू झाली.