Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:02 IST2026-01-01T18:50:58+5:302026-01-01T19:02:49+5:30
स्वित्झर्लंडमधील बारमध्ये काल स्थानिक वेळेनुसार पहाटे १:३० वाजता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठा जमाव साजरा करत असताना आग लागली. संपूर्ण इमारत लवकरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या स्वित्झर्लंडमधून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वित्झर्लंडमधील अतिशय आलिशान मानल्या जाणाऱ्या क्रांस मोंटाना या स्की रिसॉर्टमध्ये गुरुवारी पहाटे भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सुरुवातीच्या तपासानंतर, स्विस पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसून बारमध्ये आग लागल्याची पुष्टी केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "आम्ही अद्याप तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, परंतु सध्या दहशतवादी कट रचल्याचे कोणतेही संकेत नाहीत." ले कॉन्स्टेलेशन बार अँड लाउंजमध्ये मोठ्या संख्येने लोक नवीन वर्षाची पूर्वसंध्या साजरी करत असताना पहाटे १:३० वाजता आग लागली. काही सेकंदातच संपूर्ण इमारत आगीत जळून खाक झाली.
१०० हून अधिक लोक आत होते
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनास्थळी असलेल्या डॉक्टर आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातात डझनभर लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. लोक धावत होते आणि ओरडत होते आणि बरेच जण आत अडकले होते. स्फोटाच्या वेळी बारमध्ये १०० हून अधिक लोक होते, यामध्ये बहुतेक परदेशी पर्यटक आणि स्की हंगाम साजरा करणारे होते. मृतांमध्ये विविध राष्ट्रीयत्वाचे लोक होते.