सुनिता विल्यम्स चालायला विसरल्या; 7 महिन्यांपासून पृथ्वीवर परतण्यासाठी करताहेत धडपड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:09 IST2025-01-30T17:08:03+5:302025-01-30T17:09:47+5:30

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स जून 2024 पासून अंतराळात अडकल्या आहेत. यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परतीचा मार्ग खडतर बनला आहे.

Sunita Williams forgot how to walk; has been struggling to come back to Earth for 7 months... | सुनिता विल्यम्स चालायला विसरल्या; 7 महिन्यांपासून पृथ्वीवर परतण्यासाठी करताहेत धडपड...

सुनिता विल्यम्स चालायला विसरल्या; 7 महिन्यांपासून पृथ्वीवर परतण्यासाठी करताहेत धडपड...

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. अवघ्या महिन्याभरासाठी अंतराळात गेलेल्या सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परतीला विलंब होत आहे. दरम्यान, आता सुनिता यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सात महिन्यांपासून झिरो गुरुत्वाकर्षण कक्षेत राहिल्यामुळे सुनिता चालणे विसरल्या आहेत.

सुनीता विल्यम्स चालणे विसरल्या
27 जानेवारी रोजी त्यांनी नीडहॅम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी अंतराळातून संवाद साधला आणि त्यांना स्पेस स्टेशनमधील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी सुनित्या म्हणाल्या, 'मी या शुन्य गुरुत्वाकर्षण ठिकाणी खूप दिवसांपासून आहे, त्यामुळे चालणे काय असते, हे मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इथे मला चालता येत नाही, बसता येत नाही, झोपताही येत नाही. इथे फक्त आम्ही तरंगतोत. माझा सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांनाही अंतराळात अडकून राहावे लागेल, याची अपेक्षा नव्हती. त्याच्यासाठी हे थोडे धक्कादायक आहे. खरं सांगायचे तर, आम्हाला माहित होते की, साधारण एक महिना लागेल, पण त्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहणे कठीण आहे.'

सुनिता आणि बुच सात महिन्यांपासून अंतराळात अडकले 
सुनिता विल्यम्स(61) आणि बुच विल्मोर(59) एका महिन्याच्या मिशनसाठी अंतराळात गेले होते, पण त्यांच्या यानामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांना तिथेच अडकून राहावे लागले. आता दोघेही मार्चनंतर पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे. यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या SpaceX ची मदत घेतली आहे. सोबत सहकार्य करत आहे. या दोघांना परत आणण्यासाठी SpaceX चे यान पाठवले जाणार आहे.

अंतराळात दीर्घकाळ राहण्याचे परिणाम
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना मुळात अवघ्या एका महिन्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांची मोहीम 7 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली. या अनपेक्षित विस्ताराने त्यांना  शून्य गुरुत्वाकर्षणात राहावे लागत आहे. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने स्नायू आणि हाडे कमकुवत होणे, दृष्टी जाणे आणि शरीराचे संतुलन बदलणे, यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सुनिताची चालण्याची धडपड, हे या परिणामांचे उदाहरण आहे. यामुळे मंगळासारख्या दीर्घ मोहिमेसाठी मानवी शरीर तयार आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड
सुनिता आणि बुच यांना स्टारलाइनर अंतराळयानातून आयएसएसवर पाठविण्यात आले होते, परंतु यानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परत येण्यास विलंब झाला. दोघांची सुरक्षितता लक्षात घेता नासाने, त्यांना ISS वर थांबवण्याचा निर्णय घेतला. आता SpaceX च्या क्रू-10 मिशनचे अंतराळवीर मार्च किंवा एप्रिलमध्ये सुनिता आणि बुच यांना आणण्यासाठी जाणार आहे.
 

Web Title: Sunita Williams forgot how to walk; has been struggling to come back to Earth for 7 months...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.