होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद; 'मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास जहाजे पेटवून देऊ', IRGC ची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 03:48 IST2026-03-03T03:48:18+5:302026-03-03T03:48:55+5:30
Strait of Hormuz closed news Marathi : जगाची नाकेबंदी! इराणकडून 'होर्मुझ सामुद्रधुनी' बंद; जागतिक तेल पुरवठा ठप्प, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भडका उडणार

होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद; 'मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास जहाजे पेटवून देऊ', IRGC ची धमकी
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षाला इराणने आता अत्यंत आक्रमक वळण दिले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सोमवारी जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग 'होर्मुझ सामुद्रधुनी' अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला 'आग लावून भस्मसात' करण्याची थेट चेतावणी इराणने दिली आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, IRGC च्या कमांडर-इन-चीफचे वरिष्ठ सल्लागार ब्रिगेडियर जनरल सरदार इब्राहिम जबारी यांनी ही घोषणा केली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, "होर्मुझ सामुद्रधुनी आता पूर्णपणे बंद आहे. जर कोणीही हा जलमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर आमचे गार्ड्स आणि नौदलाचे जवान त्या जहाजांना आग लावून नष्ट करतील."
जगावर काय परिणाम होणार?
जागतिक तेल संकट: जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी एक तृतीयांश व्यापार याच अरुंद सामुद्रधुनीतून होतो. इराणच्या या नाकेबंदीमुळे सौदी अरेबिया, इराक आणि कुवेत यांसारख्या देशांची निर्यात ठप्प होणार आहे. अमेरिकन नौदलाने आधीच या भागात आपली उपस्थिती वाढवली आहे. इराणने जहाजे पेटवण्याची धमकी दिल्याने आता समुद्रात थेट अमेरिकन आणि इराणी नौदलांमध्ये युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महागाईचा भडका: भारतासह आशियाई देशांना लागणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा पुरवठा याच मार्गाने होतो. हा मार्ग बंद झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडतील, ज्याचा परिणाम अन्नधान्यापासून सर्वच वस्तूंच्या किमतींवर होईल.