पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं रशियाचा मित्रराष्ट्र इराणला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 07:31 PM2024-01-26T19:31:06+5:302024-01-26T19:34:58+5:30

गेल्या एक दशकापासून बीजिंगचा प्रमुख व्यापारी भागीदार असतानाही चीनने इराणला ही धमकी दिली आहे.

Stop attacks in the Red Sea or else... China threatened Iran | पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं रशियाचा मित्रराष्ट्र इराणला दिली धमकी

पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं रशियाचा मित्रराष्ट्र इराणला दिली धमकी

पाकिस्तानसोबतच्या संघर्षादरम्यान चीनने पुतीन यांच्या मित्रराष्ट्र इराणला मोठा इशारा दिला आहे. इराण आणि चीन एका विषयावरून समोरासमोर आले आहेत. इराणने स्वतःमध्ये सुधारणा न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा चीनने दिला आहे. या अनपेक्षित घटनेने रशियाही हैराण झाला आहे. इराण आणि रशिया हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. चीन आणि पाकिस्तान हेही मैत्रीपूर्ण देश आहेत. काही दिवसांपूर्वीच इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. यानंतर पाकिस्ताननेही इराणला प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. यातच आता चीनने इराणला दिलेली धमकी चर्चेत आली आहे. 

लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर हुतींकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत चीनने इराणला इशारा दिला आहे. चीनने इराणला हुतींचे हल्ले थांबवा नाहीतर व्यापार संबंध धोक्यात घालण्यास तयार राहा असे सांगितले आहे. इराण समर्थित हुती लोक लाल समुद्रातील जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या इराणी समकक्षांना हस्तक्षेप करून लाल समुद्रातील जहाजांवर इराण-समर्थित हुतींकडून सुरू असलेले हल्ले थांबवण्यास सांगितले आहे. 

इराण समर्थित हुती लाल समुद्रातील जहाजांना सतत लक्ष्य करत आहेत. लाल समुद्रातील जहाजांवर होणारे हल्ले रोखा नाहीतर बीजिंगबरोबरचे व्यापारी संबंध खराब होण्याचा धोका पत्करावा असं चीनने इराणला बजावले आहे. इराणी सूत्रांनी सांगितले की, चीन- इराणमधील स्ट्राइक आणि व्यापारावर बीजिंग आणि तेहरानमधील अलीकडील अनेक बैठकांमध्ये चर्चा झाली. मात्र याबद्दल तपशील देण्यास नकार दिला. आमच्या हितसंबंधांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचली तर त्याचा तेहरानसोबतच्या व्यापारावर परिणाम होईल असं चीनने थेट सांगितले. 

गेल्या एक दशकापासून बीजिंगचा प्रमुख व्यापारी भागीदार असतानाही चीनने इराणला ही धमकी दिली आहे. मात्र लाल समुद्रातील हल्ले गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आहेत असं हुतींनी सांगितले. हुती हल्ल्यांमुळे आशिया आणि युरोप दरम्यान चिनी जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या प्रमुख व्यापार मार्गात व्यत्यय आणून शिपिंग आणि विमा खर्च वाढला आहे.  चिनी तेल रिफायनर्सनी गेल्या वर्षी इराणच्या क्रूड निर्यातीपैकी ९०% पेक्षा जास्त खरेदी केली. यूएस निर्बंधांमुळे इराणपासून इतर अनेक ग्राहक दूर झाले आणि त्यांनी चीनी कंपन्यांना मोठ्या सवलती देऊ केल्या आणि याचा फायदा झाला. चीनच्या क्रूड आयातीपैकी केवळ १०% इराणी तेलाचा वाटा आहे आणि बीजिंगमध्ये अनेक पुरवठादार आहेत जे इतर ठिकाणांहून ही कमी भरून काढू शकतात. चीनच्या मालकीच्या कोणत्याही जहाजांना हानी पोहोचल्यास किंवा देशाच्या हितसंबंधांवर कोणत्याही प्रकारे परिणाम झाल्यास आम्ही सहन करणार नाही असं चीनकडून बजावण्यात आले आहे. 
 

Web Title: Stop attacks in the Red Sea or else... China threatened Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.