Sri Lanka: श्रीलंकेत पावसाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:00 IST2025-11-27T14:57:03+5:302025-11-27T15:00:47+5:30
Sri Lanka Rains: श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

Sri Lanka: श्रीलंकेत पावसाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता
श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत ३१ जणांना मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १४ जण बेपत्ता आहे. या आपत्तीमुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक १८ मृत्यू एकट्या मध्यवर्ती डोंगराळ भागात झाले आहेत. अडाडेराना न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १० लोक जखमी झाले असून, अजूनही १४ जण बेपत्ता आहेत. एका थरारक घटनेत, कुंबुक्काना येथे एक प्रवासी बस वाढत्या पाण्यात अडकली होती. मात्र, आपत्कालीन पथकांनी तत्परता दाखवत बसमधील २३ प्रवाशांना वाचवले, अशी माहिती डेली मिरर ऑनलाइनने दिली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत कार्याचे नियोजन करण्यासाठी अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. देशातील एकूण २५ पैकी १७ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे.
हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या आग्नेय भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता खोल दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या बट्टीकोलोआपासून २१० किलोमीटर आग्नेयेस स्थित आहे आणि तो पुढील १२ तासांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
श्रीलंकेवर मोठे संकट
गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्येही कोलंबो आणि उपनगरीय भागांसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर आला होता, ज्यात १,३४,००० हून अधिक लोक प्रभावित झाले होते. आता पुन्हा एकदा अशाच मोठ्या संकटाचा सामना श्रीलंकेला करावा लागत आहे.