विशेष लेख: उद्योगपती सोरोस यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यावरून अमेरिकेत वादाचे मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:19 IST2025-01-10T10:19:19+5:302025-01-10T10:19:44+5:30

बायडेन आणि मस्क या दोघांमध्ये या निर्णयामुळे पुन्हा एकदा चांगलीच जुंपली.

Special Article Controversy in America over awarding highest civilian award to industrialist George Soros | विशेष लेख: उद्योगपती सोरोस यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यावरून अमेरिकेत वादाचे मोहोळ

विशेष लेख: उद्योगपती सोरोस यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यावरून अमेरिकेत वादाचे मोहोळ

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन जाता जाता बरेच वादग्रस्त ठरले आहेत. आपल्या अखेरच्या काळात आणि डोनाल्ड ट्रम्प प्रत्यक्ष सत्ता सांभाळण्याच्या आधीच्या केवळ काही दिवसांत त्यांनी जे निर्णय घेतले, त्यावरून त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. 

त्यांचा मुलगा हंटर बायडेन याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत; पण आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा उपयोग करून काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्याची संपूर्ण शिक्षा माफ केली. त्यावरून मोठं वादळ उठलं. प्रत्यक्ष अमेरिकन जनतेनंही त्यांच्यावर टीका केली आणि हा पदाचा दुरुपयोग आहे असं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर हा न्यायाचाच अपमान आहे असं म्हटलं.

या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी नुकत्याच घेतलेल्या दुसऱ्या निर्णयामुळेही त्यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतं आहे. बायडेन यांनी नुकताच तब्बल १८ जणांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ देऊन सन्मान केला. पुरस्कार देण्यात गैर नाही, पण त्यात जी नावं होती, त्यातल्या विशेषत: एका नावावरून अमेरिकेत मोठं वादळ उठलं आहे. हे नाव आहे अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती जॉर्ज सोरोस. सोरोस यांचा संपूर्ण कार्यकाळच वादाच्या भोवऱ्यात गेला. त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली होती. त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार देण्यावरून अमेरिकेत आता वादंग उठले आहे. त्यात भरीस भर म्हणजे या पुरस्काराचं मेडल घेण्यासाठी सोरोस यांच्याऐवजी त्यांचा मुलगा एलेक्स सोरोस गेला. 

जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक आणि टेस्ला मोटर्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनीही सोरोस यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यावरून जोरदार टीका केली आहे. त्यांना हा पुरस्कार देणं म्हणजे अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे, असं म्हणत त्यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली. बायडेन आणि मस्क या दोघांमध्ये या निर्णयामुळे पुन्हा एकदा चांगलीच जुंपली.

पुरस्कार्थींच्या यादीत सोरोस यांचं नाव जोडण्याबाबत व्हाइट हाऊसनंही निवेदन दिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, सोरोस यांचं योगदानही खूप मोठं आहे. जॉर्ज सोरोस यांनी लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय बळकट करणाऱ्या जगभरातील संस्थांना पाठिंबा दिल्यानं त्यांचा सन्मान करण्यात आला. जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश आणि डावे विचारवंत आहेत. भारत सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांसोबत कट रचल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जॉर्ज सोरोस यांनी विरोध केला होता. जॉर्ज सोरोस यांचा जन्म १२ ऑगस्ट १९३० रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झाला होता. 

जॉर्जवर जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्यासाठी अजेंडा चालवल्याचा आरोप आहे. सोरोस यांच्या ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ या संस्थेने १९९९ मध्ये पहिल्यांदा भारतात प्रवेश केला. २०१४ मध्ये भारतातील औषधोपचार, न्याय व्यवस्था सुधारणाऱ्या आणि अपंग लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना निधी देण्यास या संस्थेनं सुरुवात केली. मात्र, २०१६ मध्ये भारत सरकारनं देशात या संस्थेमार्फत निधी देण्यावर बंदी घातली.

जॉर्ज यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये म्युनिक सुरक्षा परिषदेत दिलेल्या निवेदनाची खूप चर्चा झाली. भारत हा लोकशाही देश आहे, पण या देशाचे पंतप्रधान  लोकशाहीवादी नाहीत, असं ते म्हणाले होते. सोरोस यांनी कायमच भारतविरोधी भूमिका घेतली होती आणि भारतावर सातत्यानं टीका केली होती. काश्मीरमधून ३७० कलम हटवणं आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच ‘सीएए’च्या निर्णयावरही त्यांनी ताशेरे ओढले होते. 

जॉर्ज सोरोस यांच्या व्यतिरिक्त अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, माजी ॲटर्नी जनरल रॉबर्ट केनेडी, फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अभिनेता डेंजेल वॉशिंग्टन, स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी यांनाही हा पुरस्कार दिला गेला. लियोनेल मेस्सीही पुरस्कार वितरण समारंभाला हजर नव्हता. ज्यांना पुरस्कार मिळाला, त्यात राजकारणी, खेळाडू, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, मानवी हक्क कार्यकर्ते, वैज्ञानिक, एलजीबीटीक्यू समुदायाशी संबंधित कार्यकर्ते.. अशा अनेकांचा समावेश होता. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या अखेरच्या दिवसांत जे निर्णय घेतले, त्यामुळे त्यांनी मोठी नाराजी ओढवून घेतली.

देशासाठी आणि जगासाठी योगदान

व्हाइट हाउसच्या मते, हा प्रतिष्ठित पुरस्कार अमेरिकेची समृद्धी, मूल्यं, जागतिक शांतता किंवा सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. ज्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली, त्या साऱ्याच जणांनी देशासाठी आणि जगासाठी असामान्य योगदान दिलं आहे. यंदा या सन्मानितांमध्ये एका एनजीओचे संस्थापक जोस अँड्रेस आणि पर्यावरणवादी संशोधक गेल गुडॉल यांचाही समावेश आहे.

Web Title: Special Article Controversy in America over awarding highest civilian award to industrialist George Soros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.