विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:04 IST2025-09-02T10:03:10+5:302025-09-02T10:04:04+5:30
बांगलादेश सध्या वेगळ्याच कारणानं गाजतो आहे.

विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
शेख हसीना, बांगलादेशमधून त्यांचं पलायन, तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून मोहम्मद युनूस यांच्याकडे आलेली देशाची धुरा... तिथली अस्वस्थता, अस्थिरता, संघर्ष... हे कमी म्हणून की काय, बांगलादेश सध्या वेगळ्याच कारणानं गाजतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
बांगलादेशमध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बांगलादेशमध्ये २०२५ हे वर्ष मुलींसाठी अत्यंत वेदनादायक ठरत आहे; कारण फक्त सात महिन्यांत बलात्काराच्या घटनांमध्ये तब्बल ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगलादेश पोलिसांच्या मुख्यालयानुसार २०१४ ते २०२४ या काळात लहान मुलींविरुद्ध लैंगिक अत्याचाराची सुमारे ५६०० प्रकरणे नोंदविण्यात आली. यावर्षी जानेवारी ते जुलै २०२५ केवळ या कालावधीतच अल्पवयीन मुलींवर बलात्काराची ३०६ प्रकरणे नोंदवली गेली. जाणकारांचं म्हणणं आहे, ही तर केवळ बलात्काराची नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या आहे. ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही, ती प्रकरणं तर यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहेत. आपली बदनामी होऊ नये, लोकांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागू नये म्हणून बांगलादेश सरकार स्वत:च मुद्दाम मुलींवर होणाऱ्या बलात्काराची नोंद करीत नाही आणि गुन्हेगारांना मोकळं सोडत आहे, असा नागरिकांचा, पालकांचा आरोप आहे. सरकारला त्यांनी धारेवर धरलं आहे. त्यामुळे सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.
अल्पवयीन मुलींसाठी बांगलादेशात २०२५ हे वर्ष सुरक्षित नाही. ढाकामधून प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अहवालात म्हटले आहे, २०२४च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने प्रचंड प्रमाणात वाढ होते आहे. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनीही अलीकडेच यावरून सरकारचं वाभाडं काढताना देश सुरक्षित नाही, असा आरोप केला होता.
एन. ओ. सलीश केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अत्याचारग्रस्त मुलींचे वय पाहता कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या अहवालातील माहितीनुसार ४९ प्रकरणांमध्ये मुलींचे वय शून्य ते सहा वर्षांच्या दरम्यान आहे. ९४ प्रकरणांमध्ये मुलींचं वय ७ ते १२ वर्षे, १०३ प्रकरणांमध्ये १३ ते १८ वर्षे आहे. ६० प्रकरणांमध्ये वयाची माहिती उघड करण्यात आलेली नाही. जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ दरम्यान २२ प्रकरणे अशी होती, जी धार्मिक किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये घडली आहेत. ४९ प्रकरणे तर रस्त्यांवर घडली आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार अनेक प्रकरणांमध्ये मुलींचा आधी पाठलाग करण्यात आला, नंतर त्यांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये दोषींना पकडण्यात आणि त्यांना शिक्षा देण्यातही सरकार अपयशी ठरत आहे.
बांगलादेशमध्ये लहान मुलींसोबतच दिव्यांग मुलींवरही अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मानवाधिकार आयोगानंही याची गंभीर दखल घेताना या घटनांचं वर्णन ‘अत्यंत भयावह’ असं केलं आहे. बांगलादेशतात सध्या सरासरी दरवर्षी साधारण बलात्काराची ६०० प्रकरणं नोंदवली जात आहेत. यंदा हा आकडा विक्रमी पातळीवर पोहोचू शकतो. यामुळे नागरिक संतप्त झाले असून सरकारलाही त्यांच्या उद्रेकाची भीती वाटते आहे.