सैनिकाने पळवले हत्यारबंद वाहन, दोन तास शहरात फिरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 13:07 IST2018-06-07T13:07:37+5:302018-06-07T13:07:58+5:30
ब्लॅकस्टोन येथिल लष्कराच्या नॅशनल गार्ड बेसवरुन संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटानी एका अनोळखी व्यक्तीने या वाहनाची चोरी केलीय

सैनिकाने पळवले हत्यारबंद वाहन, दोन तास शहरात फिरवले
वर्जिनिया (अमेरिका)- बस पळवणे किंवा एखादी कार पळवण्याची घटना तुम्ही ऐकली असेल मात्र वर्जिनिया या अमेरिकेतील राज्यामध्ये चक्क हत्यारबंद वाहन पळवण्याचा उद्योग एका सैनिकाने केला आहे. वर्जिनियाची राजधानी रिचमंड येथे ही घटना घडली आहे. या सैनिकाने हे वाहन पळवलेच त्याहून शहरामध्ये फिरून दोन तास धुमाकूळ घातला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्याने या वाहनाचा ताबा सोडला. हे वाहन त्याने नॅशनल गार्ड बेस येथून पळवले होते.
ब्लॅकस्टोन येथिल लष्कराच्या नॅशनल गार्ड बेसवरुन संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी एका अनोळखी व्यक्तीने या वाहनाची चोरी केल्याचे वर्जिनिया पोलिसांचे प्रवक्ते कोरिन गेलर यांनी स्पष्ट केले. या संशयिताने लष्कराचे वाहन सर्वप्रथम पूर्वेस आणि त्यानंतर उत्तर दिशेस सुमारे 65 किमी वेगाने चालवले असेही त्यात म्हटले आहे. ही घटना लक्षात आल्यावर पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरु केला. हे वाहन एखाद्या रणगाड्याप्रमाणेच दिसते. या वाहनाने शहराच्या मुख्य भागातील कॅपिटॉल इमारतीच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. त्यानंतर कॅपिटॉल इमारतीच्या संरक्षणासाठीही तेथिल रक्षक सज्ज झाले. हेलिकॉप्टरवरुन वाहनाच्या मार्गाची निश्चिती करण्यात आली आणि सर्व वाहतूक थांबविण्यात आली. तोपर्यंत एक रणगाडा कोणीतरी चोरला आहे अशा आशयाची ट्वीटसदेखिल ट्वीटरवर येऊ लागली.
त्यानंतर रात्री 9. 40 च्या सुमारास पोलिसांनी या वाहनाला घेरले आणि जवळजवळ 95 किमीचा पाठलाग एकदाचा संपविण्यात आला. संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ही व्यक्ती एक सैनिक असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.