बांगलादेशात १८ दिवसांत सहा हिंदूंची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:16 IST2026-01-07T11:16:46+5:302026-01-07T11:16:46+5:30
आणखी एका हिंदूवर धारदार शस्त्रांनी केले वार

बांगलादेशात १८ दिवसांत सहा हिंदूंची निर्घृण हत्या
ढाका : बांगलादेशातील नरसिंदी शहरात एका किराणा दुकानाचा मालक असलेल्या मोनी चक्रवर्ती (वय ४० वर्षे) या हिंदू व्यक्तीची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. त्याच्या काही तास आधीच बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात एका हिंदू व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती.
पलाश उपजिल्ह्यातील चारसिंधूर बाजारात सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता मोनी चक्रवर्ती यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.
पोलिस व स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री दुकान बंद करून मोनी चक्रवर्ती घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, ५ जानेवारीला राणा प्रताप बैरागी यांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.
हिंदू व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ मानवी साखळी
बांगलादेशातील नरसिंगडी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी मोनी चक्रवर्ती यांच्या हत्येचा मानवी साखळी करून निषेध व्यक्त केला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.
हिंदूंवर हल्ले हा मानवतेला कलंक : अशोक गेहलोत
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार हे मानवतेला कलंक आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी मंगळवारी सांगितले. बांगलादेशने घेतलेली भारतविरोधी भूमिका हे एनडीए सरकारचे अपयश आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.