निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:49 IST2025-09-23T10:47:48+5:302025-09-23T10:49:46+5:30

अब्दुल रहीम यांना २००६मध्ये एका अपघाती हत्येच्या प्रकरणात सौदीच्या कोर्टाने दोषी ठरवले होते. काय होते हे प्रकरण?

Similar case to Nimisha Priya; Abdul Rahim, who has been in Saudi Arabia's prison for 19 years, will be released! | निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!

निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!

जवळपास दोन दशकांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या केरळच्या अब्दुल रहीम यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सौदीच्या सुप्रीम कोर्टाने त्यांच्या २० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे आणि सरकारी पक्षाने शिक्षा वाढवण्याची केलेली मागणी फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे पुढील एका वर्षात अब्दुल रहीम यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अब्दुल रहीम यांना २००६मध्ये एका अपघाती हत्येच्या प्रकरणात सौदीच्या कोर्टाने दोषी ठरवले होते. ते सौदी अरेबियात ज्या कुटुंबाकडे काम करत होते, त्यांच्यासोबतच ही घटना घडली. कुटुंबातील एका मुलाचे आयुष्य वाचवणाऱ्या लाईफ सपोर्ट उपकरणाचे बटण चुकून अब्दुल यांचा हात लागून बंद झाले. त्यामुळे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

३४ कोटींच्या 'ब्लड मनी'मुळे मिळालं जीवदान!

सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये 'ब्लड मनी' देऊन पीडित कुटुंबाची माफी मागता येते. अब्दुल रहीम यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारतात आणि जगभरातून क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ३४ कोटी रुपये जमा करण्यात आले. हे पैसे जुलै २०२४ मध्ये पीडित कुटुंबाला देण्यात आले. यानंतर, पीडित कुटुंबाने अब्दुल यांना माफ केले.

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पीडित कुटुंबाने माफी दिल्यानंतर सौदी कोर्टाने अब्दुल यांची फाशीची शिक्षा रद्द केली. मात्र, 'जन अधिकार कायद्या'नुसार त्यांना २० वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाने सरकार पक्षाने केलेली शिक्षा वाढवण्याची मागणी फेटाळून लावली आहे. अब्दुल रहीम यांनी यापूर्वीच १९ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला असल्याने, त्यांना येत्या एका वर्षात तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

निमिषा प्रिया प्रकरणाशी साधर्म्य

अब्दुल रहीम यांचे हे प्रकरण येमेनच्या तुरुंगात फाशीची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया यांच्या प्रकरणाशी मिळतेजुळते आहे. निमिषावर २०१७मध्ये त्यांच्या बिजनेस पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांच्या सुटकेसाठीही 'ब्लड मनी' जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रकरणात ब्लड मनी नाकारला जात आहे. 

Web Title: Similar case to Nimisha Priya; Abdul Rahim, who has been in Saudi Arabia's prison for 19 years, will be released!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.