थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:05 IST2025-12-05T15:04:06+5:302025-12-05T15:05:27+5:30
गाझामध्ये दहशतवादी संघटना हमासच्या नाकात दम करून सोडणारा आणि इस्रायलला मदत करणारा आदिवासी नेता यासर अबू शबाब याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
गाझामध्ये दहशतवादी संघटना हमासच्या नाकात दम करून सोडणारा आणि इस्रायलला मदत करणारा आदिवासी नेता यासर अबू शबाब याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील आपसातील भांडणातून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. यासरने गाझामध्ये हमासविरोधात लढण्यासाठी लहान-लहान गट (छोटे-छोटे समूह) तयार केले होते, ज्यामुळे हमासला आपला प्रभाव वाढवता येत नव्हता. यासरचा मृत्यू हमाससाठी दिलासादायक, तर इस्रायलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
'घरगुती भांडणा'तून हत्या
यासर अबू शबाबच्या हत्येनंतर गाझा येथील 'पॉप्युलर फोर्स' या संघटनेने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, घरातील आपसात झालेल्या भांडणात गोळीबार झाल्यामुळे त्यांच्या नेत्याचा मृत्यू झाला. काही माध्यमांमध्ये यासर अबू शबाबला हमासने मारल्याचे वृत्त येत होते, मात्र या संघटनेने त्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
इस्रायलसाठी महत्त्वाचा दुवा
अबू शबाब हा गाझामध्ये इस्रायलच्या नियंत्रणाखालील भागात सक्रिय होता आणि तो राफाह येथे राहायचा. ऑक्टोबरमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असली, तरी इस्रायलने हमासविरोधी मोहीम थांबवलेली नाही. अशा परिस्थितीत, गाझाच्या आतूनच लढणाऱ्या या पॉप्युलर फोर्ससारख्या संघटना इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या.
यासरचा गट हमासविरोधी कारवायांमध्ये सक्रिय
यासरच्या नेतृत्वाखालील पॉप्युलर फोर्सने १८ नोव्हेंबर रोजी एक व्हिडओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये शबाबच्या आदेशानंतर त्याचे लढवय्ये राफाहमध्ये दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी बाहेर पडताना दाखवले होते.
कुटुंबियांना गुप्त सहकार्य नापसंत?
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, यासर अबू शबाबला इस्रायलचे असलेले गुप्त सहकार्य त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना पसंत नव्हते. या असंतोषातूनच ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासरचा उपनेता रसन अल धीनी याने फेसबुकवर कुराणातील एक वचनाचा उल्लेख करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. रसन अल धीनी आता पॉप्युलर फोर्सेसचा नवा प्रमुख बनण्याची शक्यता आहे.
हमासचा 'एजंट' आरोप
हमासने यासर अबू शबाबला इस्रायलचा एजंट घोषित केले होते. त्याला ठार मारावे किंवा जिवंत पकडून बंदी बनवावे, असे आदेश हमासने दिले होते. यासर अबू शबाबवर हमासने एकदा चोरी, ड्रग्स तस्करी आणि हत्येच्या आरोपाखाली तुरुंगातही टाकले होते, परंतु तो तिथून पळून गेला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही एकदा कबायली गटांना शस्त्रे पुरवल्याची बाब मान्य केली होती. यासर अबू शबाबने २०२४-२५मध्येच पॉप्युलर फोर्सची स्थापना केली होती, ज्यात सुमारे ३०० लोक होते.